नागपूर : विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा करावा की नाही यासंदर्भात जनमत चाचणी घ्यायला हवी, या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर भाजपने भूमिका मांडली आहे. लहान राज्यांचे भाजपने नेहमीच समर्थन केले आहे. वेगळ्या विदर्भाची भाजपची भूमिका कायम आहे. जेव्हा लहान राज्य गठीत होतील तेव्हा विदर्भ वेगळे राज्य झाले पाहिजे अशी केंद्रीय नेतृत्वाला आम्ही विनंती केली असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नागपुरात सोमवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी त्यांनी प्रभागपद्धतीच्या गोंधळाचे खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडले. प्रभागपद्धतीबाबत महाविकास आघाडीने चूक केली होती. नियमानुसार २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या विचारात घ्यायला हवी होती. मात्र त्या सरकारने सर्व कायदे बाजुला सारून साडेचार टक्के लोकसंख्या वाढ दाखविली. विद्यमान सरकारने कायद्याप्रमाणे व २०११ च्या जनगणनेनुसार प्रभाग पद्धतीचा निर्णय घेतला. आता सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असून तेथील निर्णय सर्वांनाच मान्य करावा लागेल, असे बावनकुळे म्हणाले.
राज्य सरकारची बुलेट ट्रेन सुसाट
राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालावर भाष्य करताना त्यांनी महाविकास आघाडीची तुलना तीन चाकी ऑटोसोबत केली. नव्या सरकारच्या बुलेट ट्रेनने महाविकास आघाडीच्या ऑटो रिक्षावर मात केल्याचे स्पष्ट झाल्याचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात बुलेट ट्रेन सुसाट निघाली आहे, असे ते म्हणाले. जनतेतून थेट निवडून दिलेला सरपंच हा संपूर्ण गावाला उत्तरदायी असतो. त्या दृष्टीने शिंदे फडणवीस सरकारने सरपंचाची थेट निवड करण्याचा निर्णय घेतला होता. जनतेने निकालातूनच हा निर्णय स्वीकारल्याचे दाखवून दिले आहे, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले.