भाजपने महिला सरपंचाचा अपमान केला : बागडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 22:58 IST2019-09-14T22:57:34+5:302019-09-14T22:58:49+5:30
भाजपने पंचायत राज व्यवस्थेचे उल्लंघन करीत एका महिला संरपंचाचा अपमान केला, असा आरोप खुद्द सिल्लेवाडा येथील महिला संरपंच प्रमिला बागडे यांनी जिल्हा ग्रामीण काँग्रेसतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

भाजपने महिला सरपंचाचा अपमान केला : बागडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सिल्लेवाडा येथील बस उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा वाद सध्या जिल्ह्यात गाजत आहे. या कार्यक्रमादरम्यान भाजपने पंचायत राज व्यवस्थेचे उल्लंघन करीत एका महिला संरपंचाचा अपमान केला, असा आरोप खुद्द सिल्लेवाडा येथील महिला संरपंच प्रमिला बागडे यांनी जिल्हा ग्रामीण काँग्रेसतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश वसू, भानेगावचे सरपंच रवी चिखले, सतीश चव्हाण, तक्षशीला वाघधरे आदी उपस्थित होते. बागडे म्हणाल्या, सिल्लेवाडा येथे स्टार बस सेवेचा अधिकृत उद्घाटन सोहळा ग्राम पंचायततर्फे आयोजित करण्यात आला होता. पत्रिकाही वाटण्यात आल्या होत्या. परंतु भाजपप्रणित ग्रा.पं. सदस्य अनिल तंबाखे यांनी आ. केदार यांना बोलावू नका, असे सांगितले. तसेच त्यांना बोलावले तर अनेकांची डोके फुटतील, अशी धमकी दिली. तंबाखे व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार यांनी राजकीय श्रेय लाटण्याच्या उद्देशाने आमदार येण्यापूर्वीच कार्यक्रमाच्या स्थळासमोरच उद्घाटनाचा कार्यक्रम आटोपून टाकला. मी सरपंच म्हणून उपस्थित असतानाही मला डावलून एका महिला सरपंचाचा अपमान करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला.