नागपूर : भाजप नेते आणि विदर्भाचे माजी विभाग संघटन मंत्री अरविंद शहापूरकर यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. काही दिवसांपूर्वी एका अपघातात ते जखमी झाले होते. त्यांच्या मेंदूला मोठ्या प्रमाणात इजा झाली होती. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. मात्र शस्त्रक्रियेनंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकली नाही. शुक्रवारी रात्री नागपूर एम्स येथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
विदर्भात भाजप संघटन मजबूत करण्यात त्यांची मौलिक भूमिका होती. विदर्भातील कानाकोपरा आणि तेथील संघटनेची स्थिती याची इत्यंभूत माहिती त्यांच्याकडे असायची. त्यांच्या निधनानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक प्रकट केला आहे. विदर्भात भाजप संघटन मजबूत करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. संघटन व विचारधारेप्रती सदैव समर्पित असलेल्या शहापूरकर यांचे निधन ही पक्षासाठी कधीही न भरून येणारी पोकळी आहे.
पक्षासाठी संघर्ष काळात पराभवाने कधीही न डगमगता कार्यकर्त्यांमध्ये नवी उमेद निर्माण करण्याचे कार्य सदैव त्यांनी केले, असे गडकरी यांनी प्रतिपादन केले. तर शहापूरकर यांनी अनेक नेते, कार्यकर्ते घडविले. भाजपाने एक उत्तम संघटक गमावला आहे अशी भावना फडणवीस यांनी व्यक्त केली. शहापूरकर यांच्यावर शनिवार ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार होतील.