Maharashtra Politics: महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. संपूर्ण राज्य सरकार नागपूर मुक्कामी आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भाजपच्या सर्व मंत्री व आमदारांना ‘बौद्धिक’ देण्यात आले. रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात हा उद्बोधन वर्ग घेण्यात आला. भाजप आमदारांना उपस्थिती अनिवार्य करण्यात आली होती. विधानसभा व विधानपरिषद मिळून ११३ आमदारांची उपस्थिती होती, असे सांगितले जात आहे. यानंतर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आमच्या सर्वांसाठी ही प्रेरणाभूमी असल्याचे म्हटले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेली २५ वर्षे सातत्याने जेव्हा जेव्हा नागपुरात अधिवेशन होते, तेव्हा आम्ही भाजपचे सर्व आमदार हे या ठिकाणी स्मृतिस्थळावर येतो. डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरूजी यांच्या समाधींचे दर्शन घेतो. यंदा दोन वर्षांच्या खंडानंतर आम्ही या ठिकाणी आलो. सगळ्यांमध्ये या ठिकाणी येण्याची एक उत्कंठा होती. कारण, आमच्या सगळ्यांसाठी ही प्ररेणाभूमी आहे. ज्या राष्ट्रीयतेच्या विचारातून आम्ही देशात किंवा विविध क्षेत्रात काम करतो, त्या विचाराचा जन्म ज्या ठिकाणी झाला आणि त्याचे जे उर्जा पुरुष आहेत त्यांच्याकडून उर्जा मिळवण्यासाठी आम्ही या ठिकाणी येत असतो, असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
जनतेशी नाळ जुळवून ठेवा; भाजप आमदारांना संघाचे बौद्धिक
राज्यातील सत्ताबदलानंतर प्रथमच आमदार संघस्थानी येत असल्याने संघातर्फे काय मार्गदर्शन करण्यात येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. परंतु सर्वांना संघाच्या कार्यपद्धतीची ओळख करुन देण्यावरच भर राहिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संघातर्फे जास्त ‘बौद्धिक’ टाळण्यात आले असले तरी जनतेसोबत नाळ जोडून ठेवा असे सांगत हवा तो संदेश देण्यात आला आहे. संघ विचारधारा, कार्यप्रणाली, चालणारे उपक्रम यांची माहिती देण्यात आली. जिल्हाजिल्ह्यात आमदारांनी जनतेसोबत समन्वय जास्तीत जास्त कसा वाढेल यादृष्टीने कार्य केले पाहिजे, असा सल्ला देण्यात आला. लोकप्रतिनिधींनी जनतेच्या समस्या डोळ्यासमोर ठेवूनच काम करावे, असेदेखील सांगितले. संघातर्फे दरवर्षी नागपुरात तृतीय वर्ष वर्गाचे आयोजन करण्यात येते. या वर्गाला आमदारांनी भेट द्यावी व तेथे जवळून संघकार्य व प्रशिक्षण प्रणाली जाणून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी भाजप आमदारांना ‘भविष्यातील भारत’ या पुस्तकाच्या प्रती देण्यात आल्या.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात सर्व आमदार रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात पोहोचले. यात राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, रविंद्र चव्हाण यांच्यासह ज्येष्ठ मंत्र्यांचा समावेश होता. सर्व मंत्री व आमदारांनी आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर मार्गदर्शन वर्गाला सुरुवात झाली. संघातर्फे विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया, महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे हे उपस्थित होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"