नागपूर : राज्यातील ठाकरे सरकारमधील माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh), यांच्या मुंबई आणि नागपूरातील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज छापे टाकले. यासंदर्भात बोलताना शिवसेनानेते खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप तथा केंद्र सरकावर जोरदार निशाणा साधला होता. यानंतर आता राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना जोरदार टोला लगावला आहे. (BJP leader Devendra Fadnavis responds to Supriya Sules and Sanjay Raut)
देशमुखांवरील कारवाई मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार -अनिल देशमुख यांच्यावरील ईडीच्या कारवाईसंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, देशमुखांवरील कारवाई ही मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू आहे. या कारवाईचा कुठलाही राजकीय अन्वयार्थ काढण्याची आवश्यकता नाही. न्यायालयाने सोपविलेल्या जबाबदारीनुसारच केंद्रीय तपास यंत्रणा आपले काम करत आहेत. यामुळे यावर अधिक काही बोलण्याचे कारण नाही.
करावं तसं भरावं, आता...! यामुळं ईडीच्या कारवाईवर राष्ट्रवादीनं राजकारण करू नये, नारायण राणेंचा टोला
संजय राऊत राष्ट्रवादीनं दिलेली सुपारी वाजवत असतात -अनिल देशमुखांवरील कारवाईवर प्रतिक्रिया देताना, "सीबीआयला जर तपास करायचाच असेल तर सर्वात मोठे आणि महत्वाचे प्रकरण म्हणजे अयोध्येतील महापौरांनी अयोध्या ट्रस्टसोबत केलेल्या व्यवहाराची चौकशी करा. ती सीबीआयसाठी एकदम फिट केस आहे", असे संजय राऊत म्हणाले होते. यासंदर्भात विचारले असता फडणवीस म्हणाले, संजय राऊत यांना एक प्रकारे राष्ट्रवादीने सुपारी दिली आहे आणि ती सुपारी ते वाजवत असतात, एवढेच नाही, तर अयोध्येच्यासंदर्भात त्यांचे काही योगदान आहे का? असा सवाल करत, अयोध्येचा लढा लढणारे आम्ही आहोत. पण आयोध्येत पभू श्रीरामांचे मंदिर होत आहे, हे काही लोकांच्या पोटात दुखत आहे आणि ज्यांच्या पोटात दुखत आहे, त्यांच्या ओठात येत आहे, असा टोलाही फडणवीस यांनी यावेळी राऊतांना लगावला.
‘सुप्रिया सुळेंनाही फडणवीसांचे प्रत्युत्तर’साष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही देशमुखांवरील कारवाईसंदर्भात प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी देशमुखांवरील कारवाईचा संबंध थेट आणीबाणीशीच जोडला होता. ही आणीबाणी सदृष्य स्थिती असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, "सुप्रिया ताईंनी आणीबाणी पाहिली नाही, त्या लहाण होत्या. मीही लहाण होतो. पण त्यांनी आणीबाणी भोगलेली नाही. आम्ही ती भोगलीय. 21-21 महिने, कुठलाही आरोप नसताना माझे वडिल जेलमध्ये होते. असे लाखो लोक जेलमध्ये होते. जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या व्यक्तीला बर्फावर झोपवण्याच काम झालं होतं. तुम्हाला काय माहिती आहे आणीबाचं? असा सवालही त्यांनी एला. एवढेच नाही, तर लोकशाही पायदळी तुडवण्याचे काम सुरू होते. तेव्हा जनसंघ, समाजवादी पार्टी, कम्युनिस्टांनी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने लढा देत लोकशाही पुन्हा प्रस्थापित केली. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चाललेल्या कारवाईला आणीबाणी म्हणणे चुकीचे आहे, अशा शब्दात फडणवीस यांनी सुप्रिया सुळेंनाही टोला लगावला.