योगेश पांडे
नागपूर : भाजपच्या पदाधिकारी सना खान यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या अमित साहूची पोलिसांकडून झाडाझडती सुरू आहे. तत्कालिक वादातून सना यांची २ ऑगस्ट रोजी हत्या केल्याचा अमितने अगोदर दावा केला होता. मात्र, प्रत्यक्षात त्याने कट करूनच सना यांची हत्या केल्याची बाब समोर आली आहे. सना काहीही करून जबलपूरला याव्या, यासाठी त्याने त्यांना जाणुनबुजून उकसवले व त्या तेथे गेल्यावर त्यांचा ‘गेम’ केला. दरम्यान, रविवारीदेखील सना यांच्या मृतदेहाचा शोध सुरूच होता. मात्र, तेथील शोधपथकाच्या हाती काहीच लागले नाही.
सना खान या १ ऑगस्टला अमित साहूला भेटण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हापासून त्या बेपत्ताच होत्या. गुरुवारी सना खान यांच्या आईने मानकापूर पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली. त्यानंतर तातडीने मानकापूर व गुन्हे शाखेचे पथक परत जबलपूरला पाठविण्यात आले. त्यानंतर अमित साहूला अटक झाली व त्याच्या चौकशीत त्याने हत्येची कबुली दिली. सना खान यांनी अगोदर अमितच्या ढाब्यावर सुमारे ५० लाख रुपये गुंतविले होते. तर लग्नाच्या काही दिवस अगोदर त्याला सहा लाख रुपये व काही दागिने दिले होते. मात्र, अमितने सोन्याची चेन विकली व त्यातून वादाचा भडका उडाला.
सना अमितला सहा लाख रुपये परत मागत होत्या. मात्र, अमित देण्याच्या मनस्थितीत नव्हता. दीड महिन्याअगोदर दोघांमध्येही प्रत्यक्ष भेटीदरम्यान रस्त्यावर जोरदार भांडण झाले होते. वारंवार वाद होत असल्याने ही कटकट मागे नको, या विचारातूनच त्याने सना यांच्या हत्येचा कट रचला. त्याने व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून जाणुनबुजून सना यांना शिवीगाळ करत अपमान केला व त्यातून सना संतप्त झाल्या. अमितला नेमके हेच हवे होते. १ ऑगस्ट रोजी सना जबलपूरला निघाल्या व दुसऱ्या दिवशी सकाळी थेट अमितच्या घरी गेल्या. तेथे अमितशी वाद झाला व त्याने रचलेल्या कटानुसार त्यांची हत्या केली.
शोधमोहीम पथकासोबत अमितचा नोकर राजेश गौड
या प्रकरणात अमित साहूच्या ढाब्यावर काम करणारा नोकर राजेश गौड याला सर्वात अगोदर ताब्यात घेण्यात आले होते. त्याने कारमधून रक्ताचे डाग साफ केल्याची कबुली दिली होती. राजेश हा अमितसोबत बऱ्याच काळापासून होता. त्यामुळे त्याला त्याचे येण्याजाण्याचे अड्डे व अनेक बाबी माहिती आहे. प्रथमदर्शनी त्याचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग दिसत नसल्याने त्याला नागपुरात आणण्यात आलेले नाही. मात्र, नागपूर पोलिसांच्या शोधपथकासोबत तो जबलपूरला असून त्याला सोबत घेऊन शोधमोहीम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मृतदेहाची शोधमोहीम सुरूच
दरम्यान, सना यांच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरूच आहे. ज्या दिवशी अमितने त्यांचा मृतदेह हिरन नदीत फेकला त्यादिवशी जोरदार पाऊस झाला होता व पाण्याच्या प्रवाहामुळे मृतदेह दूरवर गेल्याची शक्यता आहे. सध्या आमची पहिली प्राथमिकता मृतदेह शोधण्यावरच असल्याची माहिती मानकापूरच्या ठाणेदार शुभांगी वानखेडे यांनी दिली.