नागपूर : भाजप नेत्या सना खान यांचा मृतदेह तब्बल १४ दिवसांनंतर बुधवारी पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती आहे. नागपूर आणि जबलपूर पोलिसांसह सना यांचे नातेवाईक सिहोर गावाकडे रवाना झाले आहेत. मृतदेह फेकल्याच्या स्थळापासून जवळपास ३०० किलोमीटर दूर अंतरावर मृतदेह मिळून आला असून तो सना खान यांचाच मृतदेह आहे की नाही, याची त्यांच्या नातेवाईकांकडून ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरु आहे.
भाजपच्या अल्पसंख्यांक सेलच्या पदाधिकारी सना खान यांचा तथाकथित प्रियकर जबलपूरमधील कुख्यात गुंड अमित शाहू याने २ आॅगस्टला खून केला होता. सना यांचा मृतदेह कारने कटंगीजवळील पुलावरून हिरन नदीत फेकला होता. हिरन नदीचा ३ किलोमीटरनंतर नर्मदा नदीशी संगम आहे. त्यामुळे सना यांचा मृतदेह खूप दूरपर्यंत वाहून गेल्याची शक्यता होती. नागपूर आणि जबलपूर पोलीस सना यांच्या मृतदेहाचा शोध घेत होते.
बुधवारी सकाळी घटनास्थळाच्या जवळपास ३०० किमी अंतरावर सिहोर गावाजवळील नर्मदा नदीच्या काठावर सना यांचा मृतदेह मिळाला. नागपूर पोलिसांचे एक पथक आणि सना खान यांचे नातेवाईक लगेच सिहोर गावाकडे रवाना झाले आहेत. सापडलेल्या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नाही. तो मृतदेह सना खान यांचाच आहे किंवा अन्य कुण्या महिलेचा आहे, याबाबत पोलीस संभ्रमात आहेत. परंतु मिळालेल्या मृतदेहाचे वर्णन सना खाना यांच्याशी जुळत असल्याची माहिती आहे.