नागपूर : राज्यसभा निवडणुकीत चमत्कार घडविल्यानंतर आता भाजपने विधान परिषदेसाठी कंबर कसली आहे. गेल्या तीन दिवसांपासून भाजप नेत्यांनी अपक्ष, लहान पक्षांसह मोठ्या पक्षातील आमदारांशीही संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे संपर्क साधण्यासाठी भाजपने आपल्या नेत्यांवर विभागनिहाय जबाबदारी निश्चत केली आहे.
भाजपचे आ. परिणय फुके यांनी याला दुजोरा दिला आहे. ‘लोकमत’शी बोलताना आ. फुके म्हणाले, राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपची तिसरी जागा निवडून येईल, यावर कुणाचाही विश्वास नव्हता. मात्र, १० जूनच्या निकालात चमत्कार दिसला. आता तोच चमत्कार २० तारखेला विधान परिषदेच्या निवडणुकीत दिसून येईल.
राज्यसभेच्या निवडणुकीत दाखवून मतदान करायचे होते. आता गुप्त मतदान आहे. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांमध्ये कमालीची नाराजी आहे. मुख्यमंत्र्यांवरही आमदार नाराज आहेत. त्यामुळे भाजपला जास्त जुळवाजुळव करण्याची गरज पडणार नाही. पण पुन्हा चमत्कार होईल, एवढे नक्की आहे. भाजपचे सर्व आमदार पक्षाचा आदेश मानतात. अपक्ष आमदार, छोट्या पक्षातील आमदार यांच्याशी संपर्क साधणे गेल्या तीन दिवसांपासून सुरू झाले आहे. बऱ्याच आमदारांकडून भाजपला साथ देण्याबाबत शब्दही देण्यात आला असल्याचा दावाही फुके यांनी केला.
भाजपमध्येही ‘गुप्त’ अंसतोषाचे काय ? - लोंढे
- भाजपने पंकजा मुंडे यांच्यासारख्या समक्ष नेत्याला उमेदवारी नाकारली. अशा अनेक फॅक्टरमुळे भाजपमध्येही अंतर्गत नाराजी आहे. भाजपमध्ये एकाधिकारशाही सुरू असल्याची अनेकांची तक्रार आहे. वचपा काढण्यासाठी अनेक लोक तयार आहेत. या गुप्त असंतोषावर भाजपने अधिक लक्ष द्यावे, असा खोचक सल्ला काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला. लोंढे म्हणाले, चमत्कार हे पुन्हा पुन्हा होत नसतात. खरा चमत्कार महाविकास आघाडीने सत्ता मिळवून घडवला होता. यावेळी एकही आमदार भाजपला साथ देणार नाही. महाविकास आघाडी सहाही जागा शंभर टक्के जिंकेल, असा दावाही लोंढे यांनी केला.