भाजप कार्यालयात जल्लोष देवडिया भवनला मात्र कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:37 AM2019-05-24T00:37:39+5:302019-05-24T00:41:05+5:30
नागपूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीची पहिली फेरी जाहीर होऊन त्यात नितीन गडकरींनी आघाडी घेताच भारतीय जनता पक्षाच्या गणेशपेठ येथील कार्यालयात जल्लोष सुरू झाला. गडकरींच्या मताधिक्क्यासोबत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत गेला. मात्र, दुसरीकडे काँग्रेसचे पक्ष कार्यालय असलेल्या देवडिया भवनात सकाळपासून एकही कार्यकर्ता फिरकला नाही. दिवसभर कार्यालयाला कुलूप लागलेले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीची पहिली फेरी जाहीर होऊन त्यात नितीन गडकरींनी आघाडी घेताच भारतीय जनता पक्षाच्या गणेशपेठ येथील कार्यालयात जल्लोष सुरू झाला. गडकरींच्या मताधिक्क्यासोबत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत गेला. मात्र, दुसरीकडे काँग्रेसचे पक्ष कार्यालय असलेल्या देवडिया भवनात सकाळपासून एकही कार्यकर्ता फिरकला नाही. दिवसभर कार्यालयाला कुलूप लागलेले होते.
नागपूरच्या मतमोजणीत पहिल्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या गणेशपेठ येथील कार्यालयात एकच जल्लोष करण्यात आला. कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत पेढे भरविले. दिवसभर कार्यालयात कार्यकर्त्यांची ये-जा सुरू होती. बहुतांश कार्यकर्ते कळमना भागात असल्यामुळे मोजकेच कार्यकर्ते कार्यालयात बसून होते. टीव्हीवर निकाल पाहत कार्यकर्ते प्रत्येक फेरीचा निकाल कधी लागतो, याकडे लक्ष देऊन होते. सायंकाळी कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी वाढली. कार्यालयावर रोषणाई करण्यात आली. ढोलताशे वाजवून, फटाके फोडून मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला. उत्साहात महिला कार्यकर्त्या फुगडी खेळल्या.
दुसरीकडे काँग्रेसच्या कार्यालयात शुकशुकाट होता. पहिल्या फेरीपासून काँग्रेसची पीछेहाट सुरू झाल्यामुळे एकही कार्यकर्ता देवडिया काँग्रेस भवनाकडे फिरकला नाही. एकामागून एक जाहीर होणाऱ्या निकालात सातत्याने काँग्रेसचे नाना पटोले यांची पीछेहाट झाली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाकडे जाणे टाळले. दिवसभर काँग्रेसच्या कार्यालयाला कुलूप लावलेले होते. कार्यालयाच्या खाली पोलीस तैनात होते. पण कार्यकर्त्यांची वर्दळ नसल्याने पोलीस एकमेकांशी गप्पा मारत पहारा देत बसले होते. सायंकाळपर्यंत काँग्रेसचा एकही कार्यकर्ता देवडिया काँग्रेस भवनाकडे फिरकला नाही.
निकालासाठी भव्य स्क्रीन पण पाहायला कुणीच नाही
काचीपुरा येथे ‘जय जवान जय किसान संघटने’चे कार्यालय आहे. हे कार्यालय काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचाराची कंट्रोल रुम होती. कार्यालयाच्या बाहेर एका मोठ्या स्क्रीनवर निवडणुकीचा निकाल पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु पहिल्या फेरीपासूनच माघारल्यामुळे पटोले यांचा एकही कार्यकर्ता या स्क्रीनवर निकाल पाहण्यासाठी फिरकला नाही. रस्त्याने जाणारा एखादाच वाहनचालक उभा राहून दोन मिनिटे निकाल पाहून निघून जात होता. कार्यालयाच्या आत २० ते २२ कार्यकर्ते टीव्हीवर निकाल पाहत बसले होते. काँग्रेसचा राज्यात झालेल्या धक्कादायक पराभवाबद्दल ते आपसात चर्चा करीत होते.