नागपूर : जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेस, भाजपाच्या कुठल्याही मुद्यावर समर्थन देण्याच्या मानसिकतेत नाही. सदस्यांच्या हिताचा प्रस्ताव भाजपाच्या सदस्यांनी मांडला असता, काँग्रेसने त्यांच्या प्रस्तावाला सभागृहातच धुडकावून लावले.
शुक्रवारी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत भाजप सदस्य सुभाष गुजरकर यांनी जि.प.तील सर्वच सदस्यांच्या हितासाठी एक प्रस्ताव सभागृहात ठेवला. खासदार, आमदार यांच्या मानधानात जशी वाढ करण्यात आली आहे, त्याच धर्तीवर जि.प. सदस्यांच्याही मानधानात वाढ करण्यात यावी, यासंदर्भातील प्रस्ताव एकमताने मंजूर करून तो शासनाकडे पाठवावा, अशी मागणी त्यांनी केली. मात्र जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध केला. आम्ही मानधन मिळविण्यासाठी नाही तर लोकांच्या सेवेसाठी निवडून आलो आहोत. तरीही ज्या सदस्यांचे मानधनाच्या प्रस्तावाला अनुमोदन असेल त्यांनी हात वर करावे. यावेळी काँग्रेसच्या एकाही सदस्याने हात वर केला नाही. सभागृहात काँग्रेसचे स्पष्ट बहुमत असल्याने हा प्रस्ताव धुडकावून लावण्यात आला.
मानधनाचा प्रस्तावच नाही, तर कृषी कायदा ते ग्रामपंचायत स्तरावरील बाबी अशा जवळपास सगळ्याच विषयांवर काँग्रेस आणि भाजपमध्ये मतमतांतर दिसून आले. कोणत्याही बाबीवर दोघांमध्ये एकमत झालेले सभागृहात दिसून आले नाही.