Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या कामासोबतच बोलण्याच्या शैलीमुळे प्रसिद्ध आहेत. नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी भ्रष्टाचाराबाबत रोखठोक वक्तव्य केलं. कामाच्या मंजुरीसाठी आपल्याला पैसे द्यावे लागले सांगणारा एकही कंत्राटदार मिळाला तर राजकारण सोडेन, असं गडकरी म्हणाले.
"पैसा कमावणं हा गुन्हा नाही. परंतु राजकारण हे पैसा कमावण्याचं साधन नाही. मी ५० लाख कोटी कोटी रुपयांची कामं केली आहेत. नागपूरातही ८६ हजार कोटी रुपयांची कामं केली आहेत. आपल्या कामाची मंजुरी घेण्यासाठी आपल्याला नितीन गडकरी यांना पैसे द्यावे लागले असं सांगणारा एकही कंत्राटदार मिळाला तर मी राजकारण सोडून देईन," असं गडकरी म्हणाले.
"मी सर्व नगरसेवकांनाही लक्ष्मी दर्शन करून नका असं सांगितलं. पैसा कमवायचा असेल व्यवसाय सुरू करायचा असेल मी मदत करतो. परंतु राजकारणातून पैसा कमावण्याचा उद्देश ठेवू नका," असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी लायब्ररीच्या कामाचं कौतुक केलं. एवढं चांगलं काम करून महापालिकेचं रेप्युटेशन खराब केल्याचं म्हणतही गडकरींनी मजेशीर टोला लगावला.