लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांनी ड्रग्जतस्करी प्रकरणात एका हवालदाराला बडतर्फ केल्यानंतर ड्रग्जविक्रीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मागील काही काळापासून एमडी व गांजा तस्करांविरोधातील कारवाईदेखील वाढली आहे. अशा स्थितीत भाजपचे पुर्व नागपुरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी सनसनाटी आरोप केला आहे. वाठोडा पोलीस ठाण्याचे ड्रग्जविक्रेत्यांना अभय असून माहिती देऊनदेखील पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या आरोपांमुळे खळबळ उडाली असून पोलीस अधिकारी यावर काय पावले उचलतात याकडे लक्ष लागले आहे.
वाठोड्यात सिम्बॉयसिस कॉलेज असून तीन वर्षांपासून तेथील प्रवेशद्वाराच्या दुकानांमध्ये एमडी, गांजा व इतर ड्रग्जची विक्री सुरू आहे. महाविद्यालयातून विद्यार्थी बाहेर पडतात तेव्हा त्यांना जाळ्यात ओढून ड्रग्जची विक्री करण्यात येते. तीन वर्षांअगोदरच याची माहिती मिळाल्यावर वाठोडा पोलीस ठाण्यातील तत्कालिन अधिकाऱ्यांना हा प्रकार कळविला होता व कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र कुठलीही कारवाई झाली नव्हती. सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय असून देशाच्या विविध भागातून तेथे विद्यार्थी शिकायला येतात. जर ड्रग्जच्या जाळ्यात विद्यार्थी अडकला तर महाविद्यालय व पर्यायाने नागपुरचे नाव खराब होईल. विद्यार्थ्यांचे भविष्य खराब होऊ नये यासाठी वाठोड्यातील अधिकाऱ्यांना माहिती दिली होती. मात्र त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात आले. आठ दिवसांअगोदर परत माहिती मिळाली की हा प्रकार सुरूच आहे. एक व्यक्ती गाडीतून येऊन ड्रग्जचा पुरवठा करतो. मात्र वाठोड्यातील काही कर्मचाऱ्यांचे विशेष संबंध असल्याने कारवाई होत नाही. पोलीस आयुक्तांनी हवालदाराला बडतर्फ करून कठोर संदेश दिला आहे. त्यांनी वाठोड्यातील हे रॅकेटदेखील मोडून काढावे. तसेच नागपुरात ड्रग्जतस्करांविरोधात विशेष पथक नेमावे अशी मागणी खोपडे यांनी केली.