नागपूर : खासदार संजय राऊत यांनी मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप केला होता. त्यावर बोलताना आमदार नितेश राणे यांनी, ‘संजय राऊत मागासवर्गीय आयोगाच्या कार्यालयात चहा द्यायला जातो का? कुणावर दबाव आहे, कुणाला नाश्ता पाहिजे आहे का,’ असा टोला लगावला.
मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना आमदार राणे म्हणाले,‘अशा प्रकरणांमध्ये छोटे-मोठे अडथळे येत असतात. कुणाच्याही आरक्षणाला हातही न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार, अशी महायुतीची भूमिका आहे.’
दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या काळात आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे हा राजीनामा ४ डिसेंबरला दिला आणि ९ डिसेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो स्वीकारला. मात्र याबाबत सरकारने कुठलीही माहिती सभागृहात दिली नाही असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.