नागपूर : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलीक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी भाजपाने शनिवारी शहरातील सर्व विधानसभा मतदार संघात निदर्शने केली. भाजपचे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना त्यांची जीभ घसरली. त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले. त्यामुळे आता राज्यात नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पूर्व नागपुरात भाजप कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. त्याचप्रमाणे दक्षिण पश्चिम नागपुरात प्रतापनगर, उत्तर नागपुरात कमाल चौक, मध्य नागपुरात गोळीबार चौक, दक्षिणमध्ये सक्करदरा येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी मलीक यांच्यावर देशद्रोहाचा आरोप करीत त्यांना मंत्रिपदावरून हटविण्याची मागणी केली. शहर अध्यक्ष आ. प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे व विकास कुंभारे, महापौर दयाशंकर तिवारी या आंदाोलनात सहभागी झाले हाेते. यावेळी आंदोलनात माजी आमदार गिरीश व्यास, संजय अवचट, बाल्या बोरकर, प्रमोद पेंडके, अर्चना डेहणकर, बंडू राऊत, विनायक डेहणकर सहभागी झाले हाेते.
- शिवसैनिक भडकले, पोलिसात तक्रार करणार
आ. खोपडे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल वापरलेल्या अभद्र शब्दांमुळे शिवसैनिक भडकले.
रविवारी शिवसैनिक लकडगंज पोलीस ठाण्यात आ. कृष्णा खोपडे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करणार आहेत.