- योगेश पांडे
नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपा-शिवसेना महायुतीमधील जागावाटपाचा ‘फॉर्म्युला’ अद्याप निश्चित झालेला नाही. दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत असले तरी, यामुळे नागपूर जिल्ह्यातील भाजपाच्या काही आमदारांना मात्र घाम सुटला आहे. एकीकडे शिवसेनेतर्फे जिल्ह्यातील पाच जागांवर दावा करण्यात आला आहे. तर दुसरीकडे भाजपातर्फेदेखील आमदारांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात येत आहे. यास्थितीत आपल्याला परत तिकीट मिळणार की नाही, या विचाराने काही आमदार अक्षरश: बेचैन झालेले आहेत.
नागपूर जिल्ह्यात विधानसभेच्या १२ जागा आहेत. मागील विधानसभा निवडणुकांत निवडणुकांसाठी भाजपा-सेना युती नव्हती. तत्कालीन राजकीय स्थितीत यापैकी ११ जागांवर भाजपाने बाजी मारली होती. सध्या जागावाटपावरून भाजपा-सेनेचे घोडे अडलेले आहे. शिवसेनेतर्फे जिल्ह्यातील पाच जागांवर दावा करण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल, रामटेक व सावनेर तर शहरातील दक्षिण नागपूर व पूर्व नागपूर या जागांचा समावेश आहे. युतीचा अद्याप ‘फॉर्म्युला’ ठरलेला नाही. मात्र सेनेच्या वाट्याला १२५ हून अधिक जागा गेल्या तर जिल्ह्यातील काही जागादेखील त्यांना जातील. अशास्थितीत आपले काय होणार, ही चिंता काही आमदारांना सतावते आहे.
दुसरीकडे, भाजपातर्फेदेखील आमदारांच्या मागील पाच वर्षांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले आहे. त्या आधारावरच काही जणांचे तिकीट कटणार असल्याची भाजपाच्या गोटात चर्चा आहे. अशा स्थितीत ज्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे राहिलेली नाही, त्यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ होण्याची चिन्हे आहेत. स्वपक्षातूनदेखील उमेदवारीसाठी दावेदार वाढले आहेत. जिल्हानिहाय झालेल्या मुलाखतींमध्येदेखील हे चित्र पाहायला मिळाले. यंदा तिकीट मिळणार की नाही, हा प्रश्न विद्यमान आमदारांसमोर उपस्थित झाला आहे. तिकीटवाटपात आपलाच क्रमांक लागावा, यासाठी वरिष्ठ पातळीवर विविध माध्यमांतून संपर्क करण्याचे प्रयत्नदेखील होत आहे. यात आता नेमके कुणाला यश येते, कुणाचे अंदाज फोल ठरतात, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.