नागपूर : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर कोणाचे वर्चस्व राहणार, याची चर्चा सुरु झाली आहे. परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे वर्धेचे खासदार आणि तीन वेळा विदर्भ केसरी राहिलेले रामदास तडस यांनी शुक्रवारी नागपुरातील जवाहर वसतिगृह येथे अर्ज भरला.
अर्जुन पुरस्कारप्राप्त लातूरचे काका पवार आणि सोलापूरचे धवलसिंग मोहिते हेदेखील अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरले आहेत. राज्यातील ४५ जिल्हा तालीम संघांपैकी ३३ तालीम संघांचा तडस गटाला पाठिंबा असल्याचे सूत्रांनी सांगितले. या पाठिंब्याच्या जोरावर या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, शनिवारी अर्जांची छाननी होईल. २६ जुलैला (मंगळवार) अर्ज मागे घेता येतील. गरज भासल्यास ३१ जुलै रोजी निवडणूक घेतली जाईल, अशी माहिती निर्वाचन अधिकारी अतुल शिवणकर यांनी दिली.
काका पवार यांनी अध्यक्ष आणि महासचिव या दोन्ही पदांसाठी अर्ज भरला आहे. वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठी विजय पराते - पुणे, धवलसिंग मोहिते - सोलापूर, महासचिव पदासाठी काका पवार - लातूर, संदीप भोंडवे - पुणे, महाराष्ट्र केसरी योगेश दोडके - पुणे यांचे अर्ज आले आहेत. कोषाध्यक्षपदासाठी मुंबईचे संजय शेट्ये यांचा एकमेव अर्ज आला असून, उपाध्यक्षपदाच्या सहा जागांसाठी १२, संयुक्त सचिवांच्या सहा जागांसाठी नऊ, तसेच कार्यकारी सदस्यांच्या आठ जागांसाठी १६ अर्ज आले आहेत. नागपूर जिल्हा संघटनेकडून गणेश कोहळे हे उपाध्यक्षपदाच्या तसेच अनिल आदमने कार्यकारिणी सदस्याच्या शर्यतीत आहेत. नागपूर नगर आखाडा संघटनेतर्फे दिलीप इटनकर आणि हरिहर भवाळकर यांनी उमेदवारी अर्ज भरले. निवडणूक बिनविरोध झाल्यास तडस यांच्या नेतृत्त्वाखालील पुढील पाच वर्षांसाठी निवडल्या जाणाऱ्या नव्या कार्यकारिणीत महासचिवपदाची जबाबदारी संदीप भोंडवे यांच्याकडे असेल, असे संकेत सूत्रांनी दिले.
कुस्तीगीर परिषदेवर भ्रष्टाचाराचे आरोप
कुस्तीगीर परिषद अनेक दशकांपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्त्वात कार्यरत होती. परिषदेच्या कार्यप्रणालीवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने कुस्ती महासंघाकडून २०१९ ते २०२३ असा कार्यकाळ असलेली परिषद तडकाफडकी बरखास्त करण्यात आली होती. महाराष्ट्रातील कुस्तीपटूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मजल मारावी. विदर्भातील कुस्तीपटूंनी चांगले प्रशिक्षण घेत देशाचे प्रतिनिधित्व करावे, हे स्वप्न असून, यासाठी केंद्र सरकारकडून विविध सोयीसुविधा, प्रशिक्षण आणि कुस्तीगिरांना मानधन प्राप्त करुन देणे अशा अनेक सुविधा आम्ही मिळवून देऊ, अशी ग्वाही रामदास तडस यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ९० मतदारांपैकी ८० टक्के समर्थन आम्हाला असल्याचा दावा त्यांनी केला.