नागपूर : लोकसभानिवडणूकांना अद्याप पाच ते सहा महिन्यांचा अवधी असला तरी भाजपचे पदाधिकारी ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. ग्रामपंचायत निवडणूकांच्या निकालानंतर जिल्ह्यात भाजपने आता गावागावांत जाऊन संघटन मजबुतीची योजना बनविली आहे. त्याअंतर्गत गाव पातळीवर पक्ष कार्यकर्त्यांचा समावेश असलेल्या समितीची रचना पूर्ण करण्यात येणार असून पुढील महिनाभर दोनशे पदाधिकारी पंधराशेहून अधिक गावांत पोहोचणार आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेदरम्यान ही माहिती दिली.
गाव तिथे भाजपा मोहिमेअंतर्गत गाव समितीची रचना पुर्ण कराण्यासाठी जिल्हयातील २०० पदाधिकाऱ्यांना जिल्हयातील ७७० ग्राम पंचायत व लहान मोठया १,५६६ गावांची जबाबदारी देण्यात आली आहे. २४ डिसेंबरपर्यंत ही मोहीम चालणार आहे. ग्रामीण भागात भाजपला संघटन मजबुती देण्यासाठी यादरम्यान भर देण्यात येणार आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्षदेखील या मोहीमेअंतर्गत तीन ग्रामपंचायतीत बैठक घेतली व ग्राम पंचायत स्तरावर अध्यक्ष तसेच ग्राम समितीची घोषणा करतील. या मोहिमेत ग्रामीण भागातील सर्व आमदार, माजी आमदार, पदाधिकारी, विविध आघाड्यांचे अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी सहभागी होतील, अशी माहिती कोहळे यांनी दिली. पत्रपरिषदेला लोकसभा निवडणुक प्रमुख अरविंद गजभिये, माजी आमदार सुधीर पारवे, श्रीकांत देशपांडे ,चरणसिंग ठाकुर, किशोर रेवतकर,अनिल निधान,आदर्श पटले, अजय बोढारे, उकेश चव्हाण, आशीष फुटाणे, रोहित पारवे, सह प्रसिध्दी प्रमुख कपिल आदमने उपस्थित होते. कोहळे यांनी यावेळी जिल्ह्यातील सर्व २० मंडळ अध्यक्षांच्या नावांचीदेखील घोषणा केली.
- गावपातळीवर निवडणार अध्यक्षया मोहिमेदरम्यानच भाजपकडून गावपातळीवरील कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात येणार आहे. त्यात गाव समितीचे अध्यक्ष, दोन महामंत्री, युवा मोर्चा अध्यक्ष यांची घोषणा करण्यात येईल. प्रत्येक गावात १३ सदस्यीच गाव समिती असेल. शहरपातळीवरील बुथप्रमुख, पेजप्रमुख उपक्रमाप्रमाणेच ही रचना असेल.