पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
By कमलेश वानखेडे | Published: September 19, 2024 11:16 PM2024-09-19T23:16:11+5:302024-09-19T23:19:37+5:30
लोकसभेप्रमाणे विधानसभेचाही दौरा निष्फळ ठरेल, अशीही काँग्रेसची टीका
कमलेश वानखेडे, नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी वर्धा येथे कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटनासाठी येत आहेत. एकीकडे भाजपाने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली असताना दुसरीकडे काँग्रेसनेविदर्भाशी संबंधित १० प्रश्न उपस्थित करून या प्रश्नांची उत्तरे पंतप्रधानांनी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी विदर्भात आले. पण त्याचा फायदा झाला नाही. आता विधानसभा निवडणुकीच्या पूर्व आले त्याचाही फायदा होणार नाही, अशी टीकाही काँग्रेसने केली आहे.
काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत १० प्रश्न उपस्थित केले. नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील सोलार पॅनेल प्रकल्प गुजरातमध्ये पळवण्यात आला. यामुळे तीन हजार युवक रोजारांपासून वंचित झाले आहेत, नागपूरमध्ये वर्षभरात महिलांवरील अत्याचाराची २४७ प्रकरण समोर आली, असे असताना भाजपची लाडकी बहीण योजना महिलांचे संरक्षण कसे करणार, विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार, विदर्भाला दुष्काळमुक्त करण्यासाठी ४५ अपूर्ण सिंचन प्रकल्प केव्हा पूर्ण करणार, अमरावतीत एका गर्भवती महिलेला रुग्णवाहिकेची वाट पहाताना मृत्यू झाला, अकोल्यातील खारट पाण्याची समस्या केव्हा दूर करणार, ५५ हजार कोटींच्या समृद्धी मार्गाला वर्षभरातच तडे गेले, दशकभरापासून अपूर्ण असलेला नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प केव्हा पूर्ण करणार, या प्रकल्पातील कॅगने उघड केलेला भ्रष्टाचारवार आपण काय करणार, असे प्रश्न उपस्थित करीत याची उत्तरे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणातून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी आ. अभिजित वंजारी, अतुल कोटेचा, उमाकांत अग्नीहोत्री, विशाल मुत्तेमवार आदी उपस्थित होते.