नागपूर : ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे तिसरी लाट येऊ शकते, अशी भीती व्यक्त होत असतानाच भाजयुमोच्या काही पदाधिकाऱ्यांकडून मात्र राजकीय फायद्यासाठी चक्क शाळकरी विद्यार्थ्यांनाच वेठीला धरण्याचा प्रकार घडला. गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त चिटणीस पार्कवर बुधवारी सकाळी सामूहिक पाढे वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात नावालादेखील फिजिकल डिस्टन्सिंग नव्हते. शाळांमध्ये कोरोनाबाधित विद्यार्थी सापडल्यानंतर अगोदरच पालक धास्तीत असताना अशा प्रकारे एकाच ठिकाणी दाटीवाटीने विद्यार्थी बोलविण्याची आवश्यकता का होती, असा संतप्त सवाल पालकांकडून उपस्थित होत आहे.
महापालिका, अग्रेसर फाउंडेशन व एका खासगी संस्थेतर्फे हे आयोजन करण्यात आले होते. संबंधित खासगी संस्था ही भाजयुमोच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी दाणी यांची असून, दुसऱ्या स्वयंसेवी संस्थेतदेखील भाजपशी जुळलेलेच लोक आहे. कार्यक्रमाला महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह पोलीस आयुक्त अमितेश कुमार हेदेखील उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी सर्व काळजी घेण्यात येईल, असा दावा आयोजकांनी केला होता. प्रत्यक्षात मात्र प्रवेशद्वारापासूनच विद्यार्थ्यांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग नसल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांना अगदी एकमेकांचा जवळ बसविण्यात आले. या आयोजनातून विद्यार्थ्यांच्या प्रकृतीला धोक्यात टाकण्याचेच काम करण्यात आल्याची पालकांची भावना होती. आश्चर्याची बाब म्हणजे पोलीस व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीदेखील तेथे असताना कुणीही या प्रकारावर आक्षेप घेतला नाही.
परवानगी मिळालीच कशी?
साध्या लग्नसमारंभात जास्त पाहुणे बोलवायचे असतील तर प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. चिटणीस पार्कात, तर अद्यापपर्यंत कुठलीही लस न घेतलेली लहान मुले होती. या विद्यार्थ्यांना संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे, असे असतानादेखील आयोजनाला परवानगी दिलीच कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. केवळ भाजयुमो पदाधिकाऱ्यांच्या आग्रहापोटी ही परवानगी मिळाली, अशी चर्चा मनपा वर्तुळात होती.
दोन हजारांहून अधिक विद्यार्थी
महापौरांनी या कार्यक्रमात दोन हजार विद्यार्थी सहभागी राहतील, असा दावा केला होता. प्रत्यक्षात दोन हजारांहून अधिक विद्यार्थी कुडकुडत्या थंडीत खाली बसले होते. विद्यार्थ्यांना त्यांनी घातलेले मास्क काढून आयोजनस्थळी देण्यात येणारे मास्क घालण्यास आयोजकांकडून सांगण्यात येत होते.