नागपूर : माजी उपमहापौर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळलेले नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर यांनी भाजपला रामराम करीत सोमवारी देवडिया काँग्रेस भवन येथे आयोजित कार्यक्रमात काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. विधान परिषद निवडणूक व अगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला आहे.
पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री सुनील केदार, शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, ग्रामीण अध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक, आमदार अभिजित वंजारी व राजू पारवे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित भोयर यांनी प्रवेश घेतला. रवींद्र भोयर म्हणाले, मी ३४ वर्षे भाजपत होतो. २० वर्षे मनपात होतो. उपमहापौर राहिलो. संघाच्या शिकवणीनुणार अन्याय करणाऱ्या इतकाच अन्याय सहन करणाराही दोषी असतो. पक्षाकडून होणाऱ्या अन्यायामुळे भाजपचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. महापालिकेच्या अगामी निवडणुकीत काँग्रेसचीच सत्ता येईल, असा विश्वास भोयर यांनी व्यक्त केला.
भाजपने चांगली वागणूक न दिल्याने भोयर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. भोयर यांच्यासारखे अनेक जण लवकरच पक्षात येतील. काँग्रेस बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रवींद्र भोयर यांनी सर्व विचार करून काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पक्ष प्रवेशाने शहर व जिल्ह्यात काँग्रेसचे नवे पर्व सुरू झाले आहे. अनेक जण लवकरच काँग्रेसमध्ये येणार असल्याची माहिती पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी दिली.
भोयर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक असण्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही जुळले असल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यावेळी जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना गावंडे, काँग्रेसचे पदाधिकारी विशाल मुत्तेमवार, उमकांत अग्निहोत्री, अतुल कोटेचा, अतुल लोंढे, संदेश सिंगलकर, नगरसेवक संदीप सहारे, नितीन साठवणे, गजेंद्र हटेवार यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.