नागपूर : भाजप पदाधिकारी सना खान हत्या प्रकरणात आरोपी अमित उर्फ पप्पू साहू हा दिशाभूल करत असल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणातील नेमके सत्य शोधण्यासाठी पोलिसांनी साहूची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात जेएमएफसी न्यायालयाला परवानगी मागितली असून, मंगळवारी त्यावर सुनावणी होणार आहे. पोलिस आणि साहूच्या वकिलांची बाजू जाणून घेतल्यानंतर न्यायालय नार्को टेस्टबाबत निर्णय देणार आहे. साहूची नार्को टेस्ट झाल्यानंतर प्रकरणातील सत्य बाहेर येण्याची अपेक्षा आहे.
अमित उर्फ पप्पू साहू याने २ ऑगस्टला सकाळी सनाची हत्या केली. २ ऑगस्टच्या रात्रीच त्याने मृतदेह मध्य प्रदेशमधील हिरन नदीत फेकून दिला होता. ११ ऑगस्ट रोजी साहूला अटक केल्यापासून पोलिस सनाचा मृतदेह आणि मोबाइलचा शोध घेत आहेत. १४ दिवसांच्या पोलिस कोठडीत पोलिसांनी साहू आणि त्याच्या साथीदारांकडून मृतदेह आणि मोबाइल ट्रेस करण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्व आरोपी पोलिसांची दिशाभूल करत होते.
तीन दिवसांपूर्वी, साहू आणि त्याचे पाच साथीदार न्यायालयीन कोठडीत तुरुंगात गेले होते. सनाचा मृतदेह आणि मोबाइल न मिळाल्याचा सर्वाधिक फायदा पप्पू साहूला मिळणार आहे. आतापर्यंतच्या तपासात तो या हत्येचा मुख्य सूत्रधार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी साहूची नार्को चाचणी करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली. पोलिसांच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. दिल्लीतील नूपुर तलवार हत्या प्रकरण आणि २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी दहशतवादी अजमल कसाबच्या नार्को टेस्टबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयांची प्रत देण्यास सांगितले. त्यावर मंगळवारी न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे.
मानकापूर पोलिसांचे पथक जबलपूरला रवाना
- दरम्यान, मानकापूर पोलिस ठाण्यातील एक पथक सनाचा मृतदेह आणि मोबाइलच्या शोधासाठी जबलपूरला रवाना झाले आहे. पप्पू साहूने सनाचा मृतदेह ज्या ठिकाणी हिरन नदीत फेकून दिला त्या ठिकाणापासून सुमारे ३ किमी अंतरावर ही नदी नर्मदेला मिळते.
- मानकापूर पोलिसांचे पथक नर्मदाच्या काठावर सुमारे शंभर किमी परिसरात नागरिकांशी बोलून घटनेशी संबंधित माहिती संकलित करणार आहे. पोलिस पथकाने सोमवारी सकाळपासूनच जागृती मोहीम सुरू केली आहे.
- साहूने सना यांचा मृतदेह नदीत फेकून दिल्याचे सांगितले. त्यामुळे नागरिकांना कपडे किंवा अन्य वस्तू मिळू शकतात, असा पोलिसांचा अंदाज आहे. या वस्तूंचा साहूविरोधात पुरावा म्हणून वापर करता येईल. साहूविरोधात हनी ट्रॅपचा गुन्हादेखील दाखल आहे.
- हत्येच्या तपासात तथ्य गोळा केल्यानंतर पोलिस हनी ट्रॅपप्रकरणी साहू आणि त्याच्या साथीदारांना अटक करणार आहेत.