योगेश पांडे
नागपूर : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल व कमीत कमी वर्षभरासाठी तरी आपली मंत्रिपदावर वर्णी लागेल या अपेक्षेत असलेल्या भाजप-सेनेच्या विदर्भातील इच्छुकांना राजकीय भूकंपामुळे जोरदार धक्का बसला आहे. अजित पवार यांच्यासोबत आलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा शपथविधी झाल्याने आता ‘मेरा नंबर कब आएगा’ असाच सवाल या इच्छुकांच्या मनात घोळत आहे. पक्षाच्या श्रेष्ठींनीच यासाठी पुढाकार घेतल्याने उघडपणे भाष्य करण्याचीदेखील सोय राहिली नसल्याने या इच्छुकांच्या मनातील अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे.
पावसाळी अधिवेशनाअगोदर मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची भाजप व शिवसेना (बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या नेत्यांना अपेक्षा होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मंत्रिपदे मिळाल्यामुळे या सर्वांचाच भ्रमनिरास झाला आहे. विशेषतः यामुळे भाजपच्या गोटामधील नेत्यांसमोर त्यांच्या राजकीय संधीबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाचा परत विस्तार होणार का व त्या संधी मिळणार का, हा सवाल आता त्यांना सतावतो आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची या राजकीय भूकंपात मोठी भूमिका असल्याने भाजपचे आमदार या दोन्ही नेत्यांकडूनच अपेक्षा लावून बसले आहेत. लोकमतने मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांशी संपर्क केला असता बहुतांश जणांनी प्रतिक्रियेसाठी नकार दिला.
पक्षात अस्वस्थता, पण लोकसभा महत्त्वाची
यासंदर्भात भाजपच्या राज्यपातळीवरील एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर मत व्यक्त केले. हा नक्कीच आमच्यासाठी मोठा आश्चर्याचा धक्का आहे. पक्षातील मंत्रिपदासाठी इच्छुकांमध्ये निश्चितच अस्वस्थता आहे. मात्र पक्षश्रेष्ठींनी भविष्यातील अंकगणित लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुका महत्त्वाच्या आहेत व ‘मिशन-४८’च्या दृष्टीने ही भूमिका घेण्यात आली आहे. मंत्रिपदासाठी भविष्यात संधी येतील, असे संबंधित पदाधिकाऱ्याने लोकमतला सांगितले.
शहराध्यक्ष म्हणतात, ऑल इज वेल
यासंदर्भात शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके यांना विचारणा केली असता या घडामोडीमुळे पक्षात कुठलीही अस्वस्थता नसल्याचा दावा केला. पक्षाच्या नेत्यांकडून जे निर्णय घेतले जातात ते पक्षहिताचेच असतात व त्याविरोधात कुणीही जाण्याचा मुद्दाच येत नाही. मुळात मंत्रिमंडळ विस्तारात कुणाचेही नाव निश्चित नव्हते. त्यामुळे कुणीही नाराजी किंवा अस्वस्थ होईल असे वाटत नाही, असे दटके म्हणाले.
याला म्हणतात ‘देवेंद्रवासी’
दरम्यान, भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मात्र या राजकीय खेळीचे स्वागत करण्यात आल्याचे चित्र होते. शरद पवारांनी सिंदखेडराजा येथील अपघातानंतर ‘देवेंद्रवासी’ या शब्दाचा प्रयोग केल्याने राजकीय वातावरण तापले. मात्र खऱ्या अर्थाने फडणवीस यांनी ‘गुगली’ टाकून राष्ट्रवादीच्या नेत्यांचे राजकारणाचे मैदानच हलविले व ‘देवेंद्रवासी’ म्हणजे काय हे दाखवून दिल्याचा कार्यकर्त्यांचा सूर होता.