लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये युतीसंदर्भात बोलणी सुरू व्हायची असली तरी पुढील निवडणुकांसाठी भाजप व शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्रित येतील. दोन्ही पक्ष समविचारी आहेत. महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी व्यक्तिगत राग, लोभ बाजूला सारून दोन्ही पक्ष एकत्र लढतील. दोन्ही पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीला संधी प्राप्त करून देण्याची चूक करणार नाहीत, असा विश्वास वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. शुक्रवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा विश्वास बोलून दाखवला. यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरात मुनगंटीवार यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँक किती नोटा छापाव्या किती नाही याचा निर्णय घेत असते. याचा एक शास्त्रशुद्ध अभ्यास केला जातो. एक नोटा किती वर्षानंतर नष्ट होते. या सर्वांचा अभ्यास करून बाद झालेल्या नोटांच्या मूल्यांइतक्या नोटा छापल्या जातात. अनिर्बंध नोटा छापता येत नाही. तसेच नोटा छपाई बंदही होऊ शकत नाही.वाघांचे मृत्यू वाढल्याबाबत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना मुनगंटीवार यांनी सांगितले की, वाघालाही नैसर्गिक मृत्यू आहे. १२ ते १५ वर्षाच्या वयानंतर त्यालाही मृत्यू येत असतो. हे नैसर्गिक मृत्यू होणारच. सर्वात मोठी समस्या ही शेतकऱ्यांनी पिकांच्या संरक्षणासाठी कुंपण केले, त्यात वीज सोडली, यात अडकून वाघाचा मृत्यू होणे ही आहे. याबाबत शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन एक कायदा करत आहोत. त्यात वन्यप्राणी शेतकऱ्यांचे शत्रू आहेत असे त्यांना वाटणार नाही. वन्यप्राण्यांपासून काही नुकसान झालेच तर १५ दिवसात त्यांना नुकसानभरपाई दिली जाईल. १५ दिवसात नुकसानभरपाई न मिळाल्यास त्याला व्याज मिळावे, असा कायदा केला जात आहे. यातून वन्यप्राण्यांचे संरक्षण होऊ शकले. याबाबत बैठक आयोजित केली असल्याचेही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.