महादेवराव जानकर : मित्रपक्षांनी केलेली मदत विसरले नागपूर : भारतीय जनता पक्षाने मित्रपक्षांना मंत्रिपदाचा दिलेला शब्द पाळावा, अन्यथा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांना जागा दाखवून देऊ , असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार महादेवराव जानकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.भाजपला शिवसेनेची साथ असल्याने राज्यात सरकारला स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे ते राष्ट्रीय समाज पक्ष, शेतकरी पक्ष व रिपब्लिकन पक्ष (आ) यांनी केलेली मदत, विधानसभा निवडणूकपूर्व केलेली युती'विसरले. भाजपचे सरकार बहुमतात आहे. त्यामुळेच ते मित्र पक्षांना दुय्यम वागणूक देत आहे. मात्र राष्ट्रीय समाज पक्षाचे संपूर्ण देशभर दोन कोटीच्यावर मतदार आहेत हे त्यांनी ध्यानात घ्यावे. महाराष्ट्रात महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतमध्ये या पक्षाचे नगरसेवक व सदस्य निवडून आलेले आहेत. आसाम, झारखंड येथे पक्षाचे नगरसेवक आहेत. शिवाय अलीकडेच पश्चिम बंगाल येथे पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाचे तीन उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले असून पक्षाचा दिवसेंदिवस जनाधार वाढत असल्याचे जानकर यांनी सांगितले. येत्या ३१ मेरोजी मुंबई येथे राष्ट्रमाता अहल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात येणार असल्याची माहिती दिली. पत्रपरिषदेला माधुरी पालीवार, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)स्वबळावर लढणार गावपातळीवर राष्ट्रीय समाज पक्ष मजबूत आहे. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्ही इतर कोणत्याही पक्षाशी युती न करता स्वबळावर निवडणूक लढणार आहोत, अधिकाधिक सदस्य निवडून आणून भाजपला आपली ताकद दाखवून देऊ, असेही त्यांनी यावेळी निक्षून सांगितले.
भाजपाने शब्द पाळावा अन्यथा जागा दाखवू
By admin | Published: May 26, 2016 3:00 AM