सौरभ ढोरे
काटोल : काटोलचे राजकीय पाॅवर सेंटर असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी भाजपाने दंड थोपटले आहेत. इकडे भाजपाच्या या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप आणि शिवसेना या महाविकास आघाडीने मजबूत तटबंदी उभी केली आहे. त्यामुळे ३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बाजार समितीच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
बाजार समितीच्या १८ संचालकांच्या पदाकारिता एकूण ५७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात तालुक्यातील राजकीय दिग्गजांचा समावेश आहे. सध्याची परिस्थिती विचारात घेता, यावेळी दुहेरी लढत होण्याची शक्यता आहे. बाजार समितीत सेवा सहकारी गटातून ११, ग्रामपंचायत गटातून ४, व्यापारी-अडते गटातून २ तर हमाल गटातून १ सदस्य निवडून दिला जातो. यातून एकाची सभापतिपदी निवड केली जाते. २०१२ पासून काटोल कृषी बाजार समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. २०१४ च्या निवडणुकीत पराभवानंतर देशमुख यांनी पुढील राजकीय मोर्चेबांधणी बाजार समितीच्या माध्यमातून केली होती. २०१९ मध्ये ते पुन्हा आमदार झाले. त्यामुळे बाजार समितीचा गड अबाधित ठेवण्यासाठी राष्ट्रवादी ताकदीने मैदानात उतरली आहे.
अशी झाली होती २०१२ ची लढत
२०१२ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अनिल देशमुख व चरणसिंग ठाकूर यांनी एकत्रित निवडणूक लढवीत १८ जागा काबीज करीत, राहुल देशमुख व केशवराव डेहनकर गटाचा पराभव केला होता.
असे आहेत मतदार
४३ सेवा सहकारी संस्थांमधील ४८२ मतदार, ८३ ग्रामपंचायतींमधील ७१३ ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी-अडतेमधील ४७ मतदार, मापारी-हमालमधून ६३, असे १३०५ मतदार १८ संचालकांची निवड करतील.
यंदाचे राजकीय समीकरण
महाविकास आघाडी करीत राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप व शिवसेना ही निवडणूक एकत्रित लढणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. गत मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या गटासोबत लढणारे ठाकूर आता भाजपच्या बॅनरवर मैदानात उतरले आहेत. इकडे आपल्या गटाचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून आणता येतील, यासाठी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनीही कंबर कसली आहे.
हे दिग्गज आहेत रिंगणात
महाविकास आघाडीच्या वतीने माजी सभापती तारकेश्वर शेळके, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते नीलकंठ ढोरे रिंगणात आहेत. दुसरीकडे भाजपच्या गटातून काटोल नगर परिषदचे गटनेते चरणसिंग ठाकूर किल्ला लढवीत आहेत. केदार यांचे समर्थक नितीन डेहनकर, दिनेश ठाकरे, विनायक मानकर हेही यावेळी रिंगणात आहेत. त्यामुळे यांच्याही आघाडी धर्माकडे साऱ्यांच्या नजरा राहतीलच. मात्र १७ सप्टेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कोण कोणासोबत आहे, हेही स्पष्ट होईल.