नागपूर : पुण्यातील मनोहर केळकर नामक व्यक्तीने तेथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केलेल्या एका तक्रारीत भाजपाचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी, सुनील जोशी आणि माधव कुलकर्णी या तिघांविरुद्ध आर्थिक फसवणूकप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.तक्रारकर्ते ७७ वर्षीय केळकर हे पुण्यात राहतात आणि त्यांनी शासनाने ताब्यात घेतलेली जमीन सोडविण्यासाठी तसेच पुण्यातील कॉसमॉस बँकेत थकीत कर्ज प्रकरणात मार्ग काढून देण्यासाठी माधव भंडारी यांच्या सांगण्यावरून त्यांचे निकटवर्ती सुनील जोशी यांच्या बँक खात्यात २०१५ मध्ये एकदा साडेतीन लाख आणि नंतर एक लाख असे साडेचार लाख रुपये आरटीजीएसने जमा केल्याचे म्हटले आहे.पुण्यातील अॅड. पागे यांच्या ओळखीने आपण २०१२ मध्ये भंडारी यांना दोन्ही कामांसाठी पहिल्यांदा भेटलो, पण त्यांनी मुख्यमंत्रीच तुम्हाला न्याय देतील, असे सांगितले. २०१४ मध्ये भंडारींना मी घाटकोपर, मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी भेटलो. तेव्हा भाजपाची सत्ता आलेली होती आणि अॅड. पागे यांच्याकडून दोन्ही कामांचे निवेदन तयार करवून आणण्यास त्यांनी मला सांगितले. ते मी तयार केले व भंडारींना भेटलो असता, त्यांनी मला सुनील जोशी यांना फोर्ट येथील कार्यालयात भेटण्यास सांगितले. जोशी यांनी आपल्याकडे मोठी आर्थिक मागणी केली, पण शेवटी पाच लाख रुपये देण्याचे ठरले. त्यातील साडेचार लाख रुपये आपण आरटीजीएसने जोशींच्या खात्यात जमा केले.पुण्याचे खासदार अनिल शिरोळे हे आपले परिचित असून, त्यांना आपण भंडारींमार्फत प्रयत्न करीत असल्याची माहिती दिली. शिरोळेंना मी भेटल्याबद्दल भंडारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली व सुनील जोशींना भेटून व्यवहार पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यानंतरच आपण जोशींच्या बँक खात्यात रक्कम भरली, असे केळकर यांनी म्हटले आहे.पैसे मिळाल्यानंतर जोशींनी आपल्याकडे पाठ फिरवली. भंडारीही टाळाटाळ करू लागले. त्यांचे स्वीय सहायक म्हणविणारे माधव कुलकर्णी हेही त्यात सामील होते. कुलकर्णी यांनी आपल्या लँड सिलिंगमध्ये अडकलेल्या जमिनीचा एक हिस्सा द्या तर तुमचे काम होईल, असे मला सांगितले होते. माझ्या कामासाठी मुख्यमंत्र्यांची मंजुरीची सही आणून देण्याच्या आमिषाआड आपली आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे केळकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे. भंडारींच्या सांगण्यावरून आपण एकदा त्यांना शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या मंत्रालयासमोरील बंगल्यातही भेटलो, तेव्हा त्यांनी आपल्याला वारंवार भेटत असल्याबद्दल खडसावले होते, असे तक्रारकर्ते केळकर यांनी म्हटले आहे.ही तक्रार हेतुपुरस्सर केल्याचे दिसते. केळकर यांचा तक्रारीमागील हेतूही मला माहीत नाही. ते माझ्याकडे कैफियत घेऊन आले होते. मी त्यांना न्याय मिळावा म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्रदेखील दिलेले आहे. त्यांनी माझ्याविरुद्ध तक्रार केलेली असेल तर त्याची सखोल चौकशी करावी. सत्य काय ते बाहेर येईल.- माधव भंडारी,भाजपाचे मुख्य प्रदेश प्रवक्तेकेळकर यांनी केलेल्या तक्रारीतील घटनाक्रम हा मुंबईतील आहे. त्यामुळे आम्ही ते प्रकरण पुणे पोलीस आयुक्तांमार्फत मुंबई पोलीस आयुक्तांना पाठविले आहे. तसे केळकर यांना कळविण्यात आले आहे.- प्रभाकर शिंदे, पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर
भाजपा प्रवक्ते भंडारींकडून फसवणूक, मुख्यमंत्र्यांच्या सहीसाठी पैसे घेतल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
By यदू जोशी | Published: December 12, 2017 1:09 AM