नागपूर : शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केल्यावरून राजकारण तापले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधानांचे वादळ जेव्हा महाराष्ट्रात येईल तेव्हा उद्धव ठाकरे उडून जातील आणि त्यांची मशाल विझेल. ते पंतप्रधानांना घाबरतात व त्यातूनच ते संभ्रमावस्थेत बोलत आहेत. ठाकरे यांनी सार्वजनिक मंचावरून व्यक्तिगत टीका करू नये. ते वारंवार मोदींवर टीका करत असून यामुळे संतापाचा स्फोट होऊ शकतो, असा इशाराच त्यांनी दिला.
नागपुरात सोमवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. उद्धव ठाकरे काय बोलतात हे त्यांनाच कळत नाही. ते संभ्रमावस्थेत बोलतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत त्यांनी एकेरी उल्लेख करण्याअगोदर त्यांनी अभ्यास करून बोलायला हवे. मोदींसमोर आपली उंची काय याचा तरी ठाकरे यांनी विचार करावा व तारतम्य बाळगावे. उद्धव ठाकरे पक्ष सांभाळू शकले नाही. ज्यांच्या पंतप्रधानांचे नाव घेत निवडून आले व आता त्यांचीच खिल्ली उडवत आहेत. ही बेईमानीच आहे. उद्धव ठाकरे लोकांना संस्कार शिकवतात व प्रत्यक्ष अशी भाषा वापरतात. भाजपच्या कार्यकर्त्यांनी किती दिवस संयम पाळायचा, असा सवाल बावनकुळे यांनी केला. बाजारसमिती निवडणूकांनंतर राज्यात मोठ्या प्रमाणात भाजपात इनकमिंग होणार आहे, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.
शरद पवारदेखील ठाकरेंना कंटाळले
अजित पवारांना शिवसेनेचे लोकच बदनाम करत आहेत. अजित पवारांशी कित्येक दिवसांत प्रत्यक्ष भेटदेखील झालेली नाही. शिवसेनेचेच लोक त्यांच्याबाबत अफवा पसरवत आहेत. महाविकासआघाडीतच धुसफूस सुरू असून शरद पवारदेखील या प्रकाराला कंटाळले आहे, असे बावनकुळे म्हणाले.
संजय राऊत जगातील सर्वात मोठे ज्योतिषी
संजय राऊत यांनी भाजप-सेना युतीचे वाटोळे केले व आता ते महाविकासआघाडीचे वाटोळे करतील हे निश्चित आहे. राऊत हे मोठमोठे दावे करतात. मात्र प्रत्यक्षात राऊत जगातील सर्वात मोठे ज्योतिषी आहेत. त्यांना अमेरिका व युरोपकडून प्रमाणपत्र मिळाले असून पाकिस्तानसह दीडशे देशांकडूनदेखील त्यांना प्रमाणपत्र मिळेल, असा चिमटा बावनकुळे यांनी काढला.