नागपूर :महाविकास आघाडीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावाचे पत्र काल विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे देण्यात आले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया देताना कशाला नामुष्की करून घेता, तुमचे २०-२५ पुन्हा आमच्याकडे येणार आहेत म्हणत विरोधी पक्षावर टीकास्त्र सोडले. अविश्वास प्रस्ताव आणायचाच होता तर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आणायला पाहिजे होता. शेवटच्या दिवशी अविश्वास प्रस्ताव आणण्याचा प्रकार म्हणजे फुसकी बॉम्ब आहे. हा फुसकी बॉम्ब सोडू नये, उद्या जर हा विषय सभागृहात आला आणि मतदान झालं तर १८४ च्या वर मतं मिळतील असं बावनकुळे म्हणाले.
या अधिवेशनात विरोधीपक्ष हा फुटकळ-फुटकळ होता. ते काय विकासाचं बोलले? त्यांनी आपली भूमिका योग्यपणे मांडली का? विदर्भ-मराठवाड्याला विकासासाठी सरकारकडून काय काढून घेता येईल, यासाठी त्यांनी बाजू मांडली का? शेतकऱ्यांना १२ तास वीज पुरवठा देण्याबाबत ते कधी भांडले का, मिहानबद्दल भांडले का? असा सवाल करीत विरोधकांनी ९० टक्के भावनात्मक पद्धतीने जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप बावनकुळेंनी केला.
विरोधकांचा कारभार दुटप्पी आहे, सभागृह काय विधानपरिषदेतही त्यांच्यात एकमत नाही. या सरकारने योग्य काम केलं. विदर्भ-मराठवाड्याला न्याय देण्याच्या घोषणा केल्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अडीच वर्ष धानाला बोनस मिळवण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी १२ तास वीजपुरवठ्याबाबत अजित पवार यांच्यापुढे नाक रगडलं परंतु, काहीच मिळाले नाही. शेवटी या सरकारने विरोधकांनी मागणी न करताही स्वत:हून धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस व इतरही सर्व घटकांना न्याय दिला, असंही बावनकुळे म्हणाले.
मतभेद की आणखी काही?; विरोधकांच्या 'त्या' अविश्वास ठरावावर विरोधी पक्षनेते अजित पवारांची सहीच नाही!
दरम्यान, काल महाविकास आघाडीची काँग्रेस विधीमंडळाच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव मांडण्याचा प्रस्ताव मांडण्याचा निर्णय घेण्यात आला, या प्रस्तावार महाविकास आघाडीतील ३९ आमदारांनी सह्या केल्या. पण, हा ठराव तांत्रिक पातळीवर टिकणे अवघड असल्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सही केली नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे अविश्वास ठराव दिला असला तरी याबाबत महाविकास आघाडीत एकमत नसल्याचे चित्र समोर आले आहे.