नागपूर : नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत वक्तव्य केले होते. यावरून भाजप नेते आणि शिंदे गटाचे नेते आक्रमक झाले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत अजित पवारांवर निशाणा साधलाय.
छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. यावरून अजित पवारांवर टीका करण्यात येत असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना प्रत्युत्तर दिले. तर बावनकुळे यांनीही पवारांवर ट्विटरवरून टीका केली. स्वार्थासाठी सेटलमेंट करणाऱ्यांना काय कळणार धर्मासाठी त्याग काय असतो ते? संभाजी महाराज धर्मवीर होते असे ट्विट त्यांनी केले. यासह छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना मानाचा मुजरा असेही नमूद केले.
देवेंद्र फडणवीसांचे अजित पवारांना प्रत्युत्तर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावरून अजित पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचे रक्षण केले. धर्म, स्वधर्म आणि हिंदू धर्म यांचे रक्षण केले. त्यांना औरंगजेबाने का मारले? संभाजी महाराजांना धर्मांतर करण्यासाठी सांगितले गेले, पण त्यांनी मान्य केले नाही. स्वदेश, स्वभूमी आणि स्वधर्मासाठी हालअपेष्टा होऊन त्यांचे बलिदान झाले. त्यांच्या शरिराचे अक्षरशः तुकडे केले. तरी छत्रपती संभाजी महाराजांनी स्वधर्म, स्वराष्ट्राची भाषा सोडली नाही. म्हणून अजित पवार आणि त्यांच्या विचारांच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक तर होतेच पण ते धर्मवीरही होते, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"