नागपूर : कसब्याचा विजय महाविकास आघाडीचा विजय नसून तो धंगेकरांचा आहे. आम्हाला अपेक्षित असलेली मते मिळाली आहेत. काँग्रेसच्या मतांची जी वाढ झाली ती पक्षाची नसून उमेदवाराची आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी कसबा निवडणुकीचा पुन्हा एकदा विश्लेषण करावे, असा सल्ला देत त्यांनी महाराष्ट्राची तयारी करावी. चारही पक्षांनी एकत्र यावे, आम्ही ५१ टक्केची तयारी करू, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्याकडे उरलेले जे नगसेवक, लोकप्रतिनिधी शाखाप्रमुख व कार्यकर्ते आहेत जे शिंदे यांच्या शिवसेने व धनुष्यबाणाकडे जाऊ नये. त्यासाठी त्यांची व पक्ष वाचविण्याची धडपड सुरू आहे. शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे पाहिले आहेत, त्यांनी हिंदुत्ववादी विचाराशी तडजोड केली. त्यामुळे कुणीही शिवसेनेचा कार्यकर्ता उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहयला तयार नाही. त्यांच्याकडे असेलेल कार्यकर्ते काही शिंदेकडे जातील तर काही आमच्याकडे येतील, असाही दावा त्यांनी केला. अडीच वर्षे मागच्या सरकारच्या काळात सत्तेचा दुरुपयोग झाला, त्यामुळे तालिबानी कोण हे सर्व जनतेला माहिती आहे, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांच्या वक्तव्यावर दिले.
महाविकास आघाडीने ४ हजार कोटी थांबविले होते
- महाविकास आघाडी सरकारने विविध विकास कामांचे तब्बल ४ हजार कोटी रुपये थांबविले होते. शिंदे-फडणवीस सरकार आल्यावर हा निधी आता मिळाल्याचे सांगत बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. नागपूर जिल्ह्याची डीपीसी ८०० कोटीची आहे. यासोबतच एसटीपी, जीएसटी मिळूण ११५० कोटी नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी निधी मिळणार आहे. त्यातून नागपूरच्या विकासाला गती मिळेल, असा दावाही त्यांनी केला.