नागपूर : बारसू प्रकल्पावरून राजकीय धुरळा उडत असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख (उद्धव ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांना ‘टार्गेट’ केले आहे. उद्धव ठाकरे यांची केंद्र सरकारला बारसू प्रकल्पासाठी पत्र दिले होते. आता त्यांनी पाठपुरावा करणे अपेक्षित होते. मात्र तेच विरोध करत आहेत. हे तर ‘सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली’ असाच प्रकार असल्याची टीका बावनकुळे यांनी केली.
नागपुरात शुक्रवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. बारसू प्रकल्पाला विरोध करणे चुकीचे आहे. उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक मंचावरून त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली पाहिजे. मात्र वैयक्तिक टीका न करता विकासावर बोलले पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये चांगला समन्वय आहे. महाराष्ट्रात डबल इंजीन सरकार आहे. अगोदर खिशाला पेन नसणारे मुख्यमंत्री होते व आता एकनाथ शिंदे हे अगदी रस्त्यावरदेखील सही करणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राला भेटले आहेत. पुढील निवडणूकांत १४८ हून अधिक जागा जिंकत जनतेला अपेक्षित असलेले सरकार भाजप-शिवसेना युती नक्कीच आणेल, असा दावा त्यांनी केला.
बाजार समित्यांचे राजकारण वेगळे
बाजार समित्यांमध्ये पक्षीय राजकारण नसते. याला कोणी आपला गट-तट म्हणवून घेऊ नये. जे निवडून येतात, ते सहकार क्षेत्रात काम करतात. सहकार क्षेत्रात याची-त्याची आघाडी, कब्जा असे काहीही नसते. बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर राजकारण करून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, असे प्रतिपादन बावनकुळे यांनी केले.