काँग्रेसच्या खांद्यावरून भाजपचा मुंढेंवर प्रहार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 08:50 PM2020-06-27T20:50:39+5:302020-06-27T20:52:12+5:30

तब्बल पाच दिवस चाललेल्या मनपा महासभेला विधिमंडळाच्या अधिवेशनाचे स्वरूप आले होते. मागील १३ वर्षांपासून सत्तेत असलेले भाजप पदाधिकारी, नगरसेवक गेल्या तीन-चार महिन्यात कमालीचे हतबल दिसत आहेत. यापूर्वीही राज्यात काँग्रेस आघाडीची तर महापालिकेत भाजपची सत्ता होती. पण अशी हतबलता दिसली नाही. म्हणूनच मनपात १०८ नगरसेवक असताना भाजपला काँग्रेस सदस्याने आणलेल्या स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून म्हणजेच काँग्रेसच्या खांद्यावरून आयुक्त तुकाराम मुंढे यांना लक्ष्य करावे लागले.

BJP strikes on Mundhe on the shoulder of Congress ! | काँग्रेसच्या खांद्यावरून भाजपचा मुंढेंवर प्रहार!

काँग्रेसच्या खांद्यावरून भाजपचा मुंढेंवर प्रहार!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तब्बल पाच दिवस चाललेल्या मनपा महासभेला विधिमंडळाच्या अधिवेशनाचे स्वरूप आले होते. मागील १३ वर्षांपासून सत्तेत असलेले भाजप पदाधिकारी, नगरसेवक गेल्या तीन-चार महिन्यात कमालीचे हतबल दिसत आहेत. यापूर्वीही राज्यात काँग्रेस आघाडीची तर महापालिकेत भाजपची सत्ता होती. पण अशी हतबलता दिसली नाही. म्हणूनच मनपात १०८ नगरसेवक असताना भाजपला काँग्रेस सदस्याने आणलेल्या स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून म्हणजेच काँग्रेसच्या खांद्यावरून आयुक्त तुकाराम मुंढे यांना लक्ष्य करावे लागले.
आर्थिक कारण देत कार्यादेश झालेल्या फाईल्स आयुक्तांनी रोखल्याने नगरसेवकांत रोष आहे. पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी निर्देश दिल्यानंतरही आयुक्तांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने सत्ताधारी व विरोधी पक्षांचे नगरसेवक नाराज आहेत. आयुक्त हुकूमशहासारखे वागतात. ते आल्यापासून शहरातील विकास कामे ठप्प झाल्याचा सत्तापक्षाचा आरोप आहे. आयुक्त व पदाधिकाऱ्यांतील संघर्ष विचारात घेता सत्तापक्षाकडून स्थगन प्रस्ताव आणून आयुक्तांना सभागृहात जाब विचारला जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु काँग्रेसचे नगरसेवक नितीन साठवणे व शिवसेनेच्या नगरसेविका मंगला गवरे यांनी आणलेल्या स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून सत्ताधाºयांनी काँग्रेसला पुढे करून आयुक्तांना लक्ष्य केले. मात्र विरोधी पक्षाच्या नगरसेवकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे व शिवसेनेचे गटनेते किशोर कुमेरिया यांनी आयुक्तांची पाठराखण केली.

काँग्रेसमध्ये फुल्ल लोकशाही!
नितीन साठवणे यांच्यावर दाखल गुन्ह्यासंदर्भात वेगळ्या आयुधाचा वापर करूनही हा मुद्दा विरोधी पक्षाला उपस्थित करता आला असता. दुसरीकडे महापौरांनाही हा स्थगन नाकारता आला असता. परंतु भाजपला प्रस्तावाच्या माध्यमातून आयतीच संधी मिळाली. पण भाजपने आयुक्तांना लक्ष्य केल्यानंतर काँग्रेस सावध झाली.
काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी चर्चेदरम्यान सत्तापक्षाला लक्ष्य केले. पण विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी आयुक्तांसह अधिकाºयांना धारेवर धरले. बंटी शेळके व कमलेश चौधरी यांनी उघडपणे आयुक्तांची बाजू घेतली. स्थगन प्रस्तावावरील चर्चेदरम्यान सत्ताधाºयांवर टीका करावी की आयुक्तांवर, अशा गोंधळात काँग्रेसचे नगरसेवक होते. त्यामुळे प्रत्येकाने आपली वेगवेगळी भूमिका मांडून पक्षात फुल्ल लोकशाही असल्याचे स्पष्ट केले.

सोशल मीडियावरील टीकेमुळे भाजप व्यथित
भाजपचे ज्येष्ठ सदस्य दयाशंकर तिवारी यांनी त्यांच्या प्रदीर्घ भाषणात आयुक्तांना धारेवर धरले. विलगीकरण केंद्र, रुग्णालयाची निर्मिती, निवारा केंद्र, कोरोनाबाधित रुग्णांचे तपासणी अहवाल, वेगवेगळ्या भागात करण्यात आलेले सर्वेक्षण आणि आयुक्तांनी समाजमाध्यमाच्या माध्यमातून केलेली प्रसिद्धी याचा जाब विचारला. पण सत्तापक्षाच्या नगरसेवकांवर सोशल मीडियावर होणाऱ्या टीकेमुळे भाजप नगरसेवक अधिक व्यथित दिसले. ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, पिंटू झलके, वैशाली नारनवरे यांनीही प्रशासनाच्या कार्यशैलीवर टीका केली.

Web Title: BJP strikes on Mundhe on the shoulder of Congress !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.