नागपूर : महाविकास आघाडीच्या १६ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या वज्रमूठ सभेवरून काँग्रेस व भाजपमध्ये घमासान सुरू झाले आहे. या सभेसाठी दर्शन कॉलनीचे मैदान दिल्याच्या विरोधात मंगळवारी भाजपचे आ. कृष्णा खोपडे यांच्या नेतृत्त्वात मैदानावरच हनुमान चालिसा पठण आंदोलन सुरू करण्यात आले. एवढेच नव्हे तर नासुप्रने सभेसाठी दिलेल्या परवानगी विरोधात उच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल, असा इशाराही आ. खोपडे यांनी दिला आहे. तर काँग्रेस नेत्यांनी सभेसाठी नियमानुसार परवानगी मिळाल्याचे सांगत कोणत्याही परिस्थितीत सभा होणारच, असा दावा केला आहे.
आ. कृष्णा खोपडे यांचा सभेसाठी मैदान देण्यास विरोध कायम आहे. मंगळवारी या मैदानावर आ. खोपडे यांच्या उपस्थितीत हनुमान चालिसा पठण आंदोलन सुरू झाले. भाजपचे बहुतांश माजी नगरसेवक व पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले. दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. माजी नगरसेवक हरीश डीकोंडवार,धर्मपाल मेश्राम, बंटी कुकडे, निशा भोयर, सन्नी राऊत, वंदना भूरे, मनीषा कोठे, राजेंद्र गोतमारे, समीता चकोले, विजय ढोले, सचिन वानखेडे, अजय सराडकर, दिव्या धुरडे, अनिल राजगीरे, हेमंत आखरे, मंगेश साखरकर, आशीष कलसे,इब्राहिम चूड़ीवाले,शंकर गायधने,पप्पू सातपुते, संगीता आदमाने आदींनी आंदोलनात भाग घेतला.
आ. खोपडे म्हणाले, सदभावनानगर, दर्शन कॉलनीचे मैदान हे खेळांसाठी आरक्षित आहे. नुकतेच कोट्यवधी रुपये खर्च करून हे मैदान तयार करण्यात आले आहे. खेळाच्या या मैदानाचे नुकसान होऊ नये म्हणून स्थानिक नागरिकांचा येथे राजकीय सभा घेण्यास विरोध आहे. मंगळवारपासून येथील नागरिक त्याच मैदानावर आंदोलनाला बसले असून हनुमान चालिसा पठण केले जात आहे. येथील लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत आपण सभेला नासुप्रने दिलेली परवानगी रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे आ. खोपडे यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस नेत्यांनी केली मैदानाची पाहणी- महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सभेसाठी जोरात तयारी सुरू केली आहे. मंगळवारी सकाळी काँग्रेस नेत्यांनी मैदानाची पाहणी केली. यावेळी माजी मंत्री सुनील केदार, आ. अभिजित वंजारी, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, माजी आ. अशोक धवड, जि.प. अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, उपाध्यक्ष कुंदा राऊत, माजी नगरसेवक तानाजी वनवे, प्रफुल्ल गुडधे, नरेंद्र जिचकार आदींच्या उपस्थितीत सभेच्या प्रचार रथांना हिरवी झेंडी दाखविण्यात आली. सभास्थळी गेल्या आठवडाभरापासून काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांची ये-जा सुरू आहे. मात्र, आम्हाला स्थानिक नागरिकांचा कुठलाही विरोध दिसलेला नाही. भाजप नेते आपल्या कार्यकर्त्यांना समोर करून विरोध करीत आहेत, असा टोला राजेंद्र मुळक यांनी यावेळी लगावला.