नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीत नागपूर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात भाजपचे उमेदवार लढतील. तो भाजपचा नैसर्गिक अधिकार आहे. राज्यात महायुती आहे. पण ‘सिटिंग गेटिंग’ द्यावी लागेल. जिल्ह्यात शिंदे गटाचा एकही आमदार नाही. अजित पवार गटाचा जिल्ह्यात एक सरपंचही नाही. जिल्ह्यात ताकद भाजपची आहे. महायुतीला देण्यालायक काहीच नाही, असे चिमटे काढत भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी महायुतीला जिल्ह्यात एकही जागा सोडणार नसल्याचे स्पष्ट केले.
कोहळे म्हणाले, रामटेक लोकसभेत शिंदे सेनेला मिळालेली मते ही भाजपची आहेत. कामटी व हिंगणा आम्ही जिंकलो, तर सावनेर, रामटेक, उमरेड, काटोलमध्ये भाजप लढली आहे. लोकसभेत रामटेक व काटोल हे दोन मतदारसंघ फक्त पाच हजारांनी मागे आहोत. विधानसभेत हा फरक मिटवणे कठीण नाही.
महायुतीने जागा मागितल्या आहेत. रामटेकचे आमदार आशीष जयस्वाल हे अपक्ष म्हणून विजयी झाले होते. त्यांनी शिंदे गटात अधिकृत प्रवेश केल्याचे माझ्या पाहण्यात वाचण्यात नाही. मी अनेकदा त्यांच्याकडे याबाबत विचारणाही केली आहे. अजित पवार गटाचे नागपूर जिल्ह्यात काय आहे, एक सरपंच नाही. एक पंचायत समिती सदस्य नाही. त्यामुळे उमेदवारीसाठी विनाकारण आग्रह धरून सत्ता घालविण्यात अर्थ नाही. भाजपकडे सहाही जागांवर लढण्यासाठी सक्षम उमेदवार आहेत. यावेळी सर्व सहाही जागा भाजप जिंकेल.निरीक्षकांसोबत आमची सविस्तर चर्चा झाली आहे, असेही कोहळे यांनी सांगितले.
प्रत्येक मतदारसंघात २५ हजार मतदार नोंदणी- विधानसभा निवडणुकीसाठी भाजप जोमाने कामाला लागली आहे. भाजपतर्फे १ ते ३० जुलै दरम्यान प्रत्येक मतदारसंघात २५ हजार नव्या मतदारांची नोंदणी केली जाईल. यानंतर दोन महिने या मतदारांशी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रत्यक्ष संपर्क साधतील, असेही कोहळे यांनी सांगितले.