कमलेश वानखेडे, लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात संविधान लागू झाल्यानंतर गरीब, कामगार, मजूर, महिला सर्वांना मतदानाचा अधिकार मिळाला. ब्रिटिशांच्या काळात फक्त श्रीमंतांनाच मतदानाचा अधिकार होता. आता मात्र सर्वांच्या मताचे महत्त्व सारखे आहे; पण हे हुकूमशाहीचे लोक आहेत. हे संविधान व लोकशाही संपवतील. मोदी पुन्हा सत्तेत आले तर देशात पुढे निवडणुकाच होणार नाहीत. त्यामुळे स्वत:च्या रक्षणासाठी यांना हद्दपार करा, अशा शब्दात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे यांनी हल्लाबोल केला.
खरगे यांनी रविवारी दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यानंतर काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत खरगे यांनी पंतप्रधान मोदी हे सातत्याने खोटे बोलत असल्याची टीका केली. ते म्हणाले, मोदींनी काळे धन परत आणले नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही. देशाची आर्थिक स्थिती सुधारली नाही. प्रत्येक गरिबाला घर मिळाले नाही. युवकांना दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या मिळाल्या नाहीत. यावर पंतप्रधान मोदी हे रेटून खोटे बोलत गेले. आता मोदींची गॅरंटी म्हणतात तर मग पूर्वीची गॅरंटी कुणाची होती, असा सवालही त्यांनी केला. भाजप विरोधी नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावते; पण आता त्याच २३ भ्रष्टांना घेऊन बसले आहेत. भाजपकडे मोठी वॉशिंग मशीन आहे. त्यात टाकले की नेता क्लीन होऊन जातो, अशी टीका त्यांनी केली.