अशोक चव्हाण यांचा आरोप : काँग्रेसचा स्थापना दिवस उत्साहात नागपूर : एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणूक प्रचार सभांमध्ये मोठमोठ्या घोषणा करतात तर दुसरीकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे मतदारांना लक्ष्मीदर्शन करा, लक्ष्मी नाकारू नका, असे सांगत आहेत. भाजपने निवडणुका कामे करून, लोकांची मने जिंकून जिंकलेल्या नाहीत तर प्रलोभने दाखवून, लक्ष्मीदर्शन करून जिंकल्या आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला. नागपूर शहर काँग्रेस समितीतर्फे १३१ वा स्थापना दिन सोहळा पश्चिम नागपुरातील पोलीस लॉन येथे बुधवारी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यासह महाराष्ट्र प्रभारी खा. मोहन प्रकाश, माजी मंत्री विलास मुत्तेमवार, पालक पदाधिकारी आ. विजय वडेट्टीवार, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, माजी खा. गेव्ह आवारी, अनंतराव घारड आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी नोटाबंदीच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर तोफ डागली. चव्हाण म्हणाले, दोन-चार हजार रुपये मिळविण्यासाठी सामान्य जनतेला तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे, तर दुसरीकडे भाजप नेत्यांच्या गाडीत लाखो रुपयांच्या नव्या नोटा सापडत आहेत. नोटाबंदीनंतर व्यापार ठप्प व बाजारपेठा ओस पडल्या आहेत. ज्या व्यापाऱ्यांनी आशेने कमळावर शिक्के मारले तेच आता ‘हमारी भूल, कमल का फूल’ म्हणू लागले आहेत. एकीकडे विजय मल्ल्यासह उद्योगपतींचे कर्ज माफ केले जात आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारली जात आहे. सरकारला संवेदना उरलेल्या नाहीत, अशी टीका त्यांनी केली. शिवसेनेची अवस्था अडचणीची झाली असून, पंतप्रधानांच्या बाजूला आमच्या पक्षप्रमुखांना बसू द्या, अशी विनंती करण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे, असा चिमटाही त्यांनी घेतला. विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, स्वातंत्र्यानंतर देशात सुई देखील तयार होत नव्हती. मात्र, आता पंतप्रधान मोदी ज्या विमानांनी विदेशात फिरत आहेत, ती विमाने काँग्रेसच्या राजवटीतच देशात तयार झाली आहेत. काळा पैशाविरुद्धच्या लढाईचे सोंग घेऊन भाजप घोटाळेबाजांची फौज सोबत घेऊन सत्ता चाखत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. नागपुरात काँग्रेसचा झेंडा फडकला तर पुढे देशही वाचेल, असे सांगत त्यांनी भाजपचा भ्रष्टाचार जनतेसमोर मांडण्याचे काँग्रेसजनांना आवाहन केले. विकास ठाकरे म्हणाले, लोकसभा व विधानसभेत काँग्रेसचा पराभव झाला. मात्र, त्यानंतरही काँग्रेसच्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन, हिंमत देऊन नागपुरात भाजपचे हेवीवेट नेते असतानाही भाजप विरोधात लढा उभा केला. भाजपने महापालिकेत जनतेच्या पैशाची लूट चालविली आहे. पाणीपुरवठा, स्टार बस आदीमध्ये घोटाळे करून पैशाची लूट करण्याचा गोरखधंदा सुरू आहे. आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी कंबर कसली आहे. १ ते १० जानेवारीदरम्यान काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपाविरोधात पोलखोल यात्रा काढणार असून, भाजपच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त केक कापण्यात आला. या वेळी माजी आ. अशोक धवड, प्रा. हरिभाऊ केदार, प्रदेश सरचिटणीस प्रफुल्ल गुडधे, सचिव अतुल कोटेचा, उमाकांत अग्निहोत्री, सुरेश भोयर, अॅड. अभिजित वंजारी, रविंद्र दरेकर, झिया पटेल, गिरीश पांडव, प्रमोद सिंग ठाकूर, प्रशांत धवड, रामकिशन ओझा, अभिजित सपकाळ, मुजीब पठाण, संदेश सिंगलकर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळके, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
भाजपने लक्ष्मीदर्शन करून निवडणुका जिंकल्या
By admin | Published: December 29, 2016 2:35 AM