नागपूर : जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदांसाठी गुरुवारी निवडणूक पार पडली. तीत नरखेड पंचायत समितीत उपसभापती पदाच्या निवडणुकीत अर्ज सादर करताना राष्ट्रवादीचे उमेदवार मयूर उमरकर यांचे टायमिंग चुकल्याने बहुमत नसतानाही भाजपचे स्वप्निल नागापुरे अविरोध विजयी झाले. मात्र घड्याळाच्या पक्षाकडून घड्याळातच गडबड झाल्याने नरखेड राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
८ डिसेंबरला होऊ घातलेल्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या (विधानपरिषद) पार्श्वभूमीवर पं.स.सभापती पदाच्या निवडणुकीला विशेष महत्व आले होते.
२०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत नरखेड पंचायतीच्या आठही जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळविला होता. पोटनिवडणुकीत येथे राष्ट्रवादीने दोन जागा गमाविल्या. त्यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ सहावर आले असले तरी बहुमत त्यांच्याजवळ होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागल्याने काटोल-नरखेड तालुक्यात घड्याळाचे काटे उलटे फिरताना दिसत आहेत. गत महिन्यात काटोल बाजार समितीत राष्ट्रवादीचा पराभव झाला. गुरुवारी उपसभापतिपदाच्या निवडणुकीत केवळ समन्वयाच्या अभावामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार निर्धारित वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करू शकला नाही, हे विशेष.
कळमेश्वर पंचायत समितीच्या सभापतिपदी कॉंग्रेसचे श्रावण भिंगारे अविरोध विजयी झाले. यापूर्वी कळमेश्वर तालुक्यातील सहा पंचायत समिती गणांसाठी झालेल्या निवडणुकीत सहाही उमेदवार काँग्रेसचे विजयी झाले होते. पोटनिवडणुकीतही कोहळी पंचायत समिती गणांत भिंगारे विजयी झाले. त्यामुळे पुन्हा एकदा सभापतिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. रामटेक पंचायत समितीवर पुन्हा एकदा कॉंग्रेसने वर्चस्व सिद्ध केले. सभापतिपदी कॉंग्रेसच्या कला ठाकरे बिनविरोध विजयी झाल्या. ओबीसी आरक्षणामुळे ठाकरे यांना सभापतिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पोटनिवडणुकीत त्या जिंकल्या.
मात्र उमरी गणाची कॉंग्रेसला गमावाली लागली होती. येथे गोंगपाचे रामकृष्ण वरखेडे विजयी झाले होते. त्यामुळे पंचायत समितीत काँग्रेसचे संख्याबळ ४ वर आले होते. यासोबतच शिवसेनेचे चार, तर भाजपा आणि गोंगपाचा प्रत्येकी एक सदस्य येथे आहे. त्यामुळे सभापतिपदाच्या निवडणुकीत गडबड होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र शिवसेनेने येथे आघाडीचा धर्म पाळल्याने ठाकरे अविरोध विजयी झाल्या.
कामठी पंचायत समिती उपसभापतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे आशिष मल्लेवार यांनी बाजी मारली. त्यांनी भाजपच्या पूनम मालोदे यांचा दोन मतांनी पराभव केला.
मौदा पंचायत समिती सभापती आणि उपसभापतिपदाची अविरोध पार पडली. येथे कॉंग्रेसच्या वंदना सिंगनजुडे यांची सभापती, तर शिवसेनेचे ज्ञानेश्वर चौरे यांची उपसभापतिपदी निवड झाली. येथेही कॉंग्रेस आणि शिवसेनेने आघाडीचा धर्म पाळला. हिंगणा पंचायत समिती सभापतिपदाची निवडणूक उमेदवारांनी जातवैधता प्रमाणपत्र न सादर केल्यामुळे ऐन वेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रद्द केली. हिंगणा पंचायत समिती सभापतिपद इतर मागासवर्गीयकरिता आरक्षित होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून रूपाली खाडे यांनी, तर भाजपकडून संजय ढोढरे यांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते. मात्र दोन्ही उमेदवारांनी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र जोडले नसल्याने त्यांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रद्द ठरविले.