लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या नेत्याला विजय मिळेल की पराजय, या मुद्यावरून भाजपा कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू असतानाच एकाने त्याची मोबाईलमध्ये क्लीप तयार केली. त्यामुळे प्रकरण मुद्यावरून गुद्यावर आले. त्यानंतर विलास करंगळे आणि त्यांच्या एका साथीदाराने आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्याचे घर गाठून त्याला आणि त्यांच्या बचावासाठी आलेल्या त्यांच्या पत्नीलाही मारहाण केली. गुरुवारी रात्री घडलेल्या या प्रकरणाची हुडकेश्वर पोलिसांनी अदखलपात्र अशी नोंद केली आहे.लोकसभा निवडणुकीचा काय निकाल लागेल, यावरून भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये गुरुवारी रात्री चर्चा सुरू होती. भाजपा शहराध्यक्ष, आमदार सुधाकर कोहळे यांचे राईट हॅण्ड समजले जाणारे विलास करंगळे, विजय वानखेडे आणि अन्य काही जण त्या चर्चेत सहभागी झाले होते. भाजपा नेते नितीन गडकरी हे किती मतांनी निवडून येतील, यावर चर्चा सुरू असताना गडकरी ४० हजार मतांनी पराजित होतील, असे कुणीतरी यावेळी म्हटले. सुदाम वामनरावर सांगुळ (वय ५४ रा. उदयनगर) हे शूटिंग करीत असल्याचा संशय करंगळे यांना आला. त्यामुळे करंगळेंनी सांगुळ यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. त्यावरून त्यांच्यात चांगलाच वाद झाला. प्रकरण हाणामारीवर पोहोचल्याने यावेळी बाकीच्यांनी मध्यस्थी करून कसाबसा वाद सोडवला. त्यानंतर सांगुळ त्यांच्या उदयनगरातील घरी निघून गेले. मध्यरात्री करंगळे आणि राणा सांगुळ यांच्या घरासमोर आले. त्यांनी सांगुळ यांना शिवीगाळ करीत घराबाहेर बोलाविले. ‘माझी मोबाईलमध्ये क्लीप का बनविली’, अशी विचारणा करीत करंगळे आणि त्यांचा साथीदार राणा या दोघांनी सांगुळ यांना मारहाण केली. ते पाहून सांगुळ यांची पत्नी मदतीला धावली. त्यांनाही दोघांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे आजूबाजूची मंडळी गोळा झाल्याने करंगळे आणि साथीदार पळून गेल्याचे समजते.या घटनेमुळे उदयनगर परिसरात तणाव निर्माण झाला होता. सांगुळ यांनी हुडकेश्वर ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी करंगळे आणि राणाविरुद्ध अदखलपात्र (एनसी) गुन्ह्याची नोंद केली. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे ठाणेदार संदीप भोसले यांनी सांगितले आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
नागपुरात भाजपा कार्यकर्त्यांत हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 10:33 AM
आपल्या नेत्याला विजय मिळेल की पराजय, या मुद्यावरून भाजपा कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू असतानाच एकाने त्याची मोबाईलमध्ये क्लीप तयार केली. त्यामुळे प्रकरण मुद्यावरून गुद्यावर आले.
ठळक मुद्देमोबाईलने वाढवला वादमोबाईल क्लीपसाठी पतीसोबत पत्नीलाही मारहाण