Shyam Manav Latest News: अंधश्रद्धा निर्मूल समितीच्या वतीने नागपूरमध्येश्याम मानव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. श्याम मानव यांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरजोरात घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यामुळे काही काळ कार्यक्रम स्थळी तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करत भाजपाच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढले.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने नागपूरमध्ये श्याम मानव यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याने व्यासपीठावरील व्यक्तींना प्रश्न विचारला की, २०१४ पासून संविधानात काय बदल झाले? आम्हाला सांगा. त्यानंतर भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.
भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते म्हणाले, अंधश्रद्धा निर्मूलन समिती संविधानाचा आधार घेऊन जर समाजात भेदभाव करत असेल आणि फडणवीस साहेबाचं नाव घेत असेल, तर हे कुणाचे समर्थक आहेत? यांनी उत्तर द्यावं. यांनी कुणाचा ठेका घेतला आहे? २०१४ नंतर संविधानात असे कुठले बदल झाले? हे कोणत्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात, हे त्यांनी सांगावं, असे सवाल भाजपा कार्यकर्त्यांनी केले.
श्याम मानव काय म्हणाले?
"ज्या नागपूरमध्ये वेगवेगळ्या विचारधारेचे लोक एकत्र राहतात. जाहीरपणे एका व्यासपीठावर येऊन मते मांडतात. त्या नागपूरमधूनच संविधान खतम होत आहे, या पद्धतीची परिस्थिती निर्माण होत चालली आहे. मला अशा गोष्टींची नेहमी सवय आहे.माझ्यासाठी नवी गोष्ट नाहीये", असे श्याम मानव म्हणाले.
"ज्या पद्धतीचा गोंधळ सुरू झाला... विषयच असा आहे की, संविधान बचाव, महाराष्ट्र बचाव. आमचा एक वक्ता बोलत असताना मध्ये या पद्धतीने गोंधळ घालणं, म्हणजे ही केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरची गदा नाही, ही लोकशाहीवरची गदा आहे. आचारसंहिता घोषित झाल्यानंतर जर हे लोक या पद्धतीने वागत असतील, तर हे किती संविधान वाचवणारे आहेत की बुडवणारे आहेत, याचा उत्कृष्ठ पुरावा ते लोकांसमोर देत आहेत", अशी भूमिका श्याम मानव यांनी मांडली.