लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’शी लढा देण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फेदेखील पुढाकार घेण्यात आला असून, राज्यभरात सव्वा लाख कार्यकर्ते काम करत आहेत. गरजूंच्या मदतीसाठी राज्यभरात ३०० ठिकाणी ‘कम्युनिटी किचन’ सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून कामगार, गरिबांच्या अन्नपाण्याची सोय करण्यात येत आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी या सेवाकार्याचा आढावा घेतला व जास्तीत जास्त गरजूंपर्यंत पोहोचण्याचे राज्यातील पदाधिकाऱ्यांना आवाहन केले.मागील तीन दिवसात फडणवीस यांनी राज्यातील भाजप खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, पदाधिकारी, जिल्हाध्यक्षांसमवेत संवादसेतूच्या माध्यमातून संवाद साधला. रविवारी त्यांनी सेवाकार्याचा आढावा घेतला व संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या. राज्यात ४५० मंडळांमध्ये भाजपचे काम सुरू आहे. दहा जिल्ह्यांमध्ये रक्तदानाचे काम सुरू झाले आहे, तर हजार खेड्यांमध्ये ‘सॅनिटायझेशन’चे काम करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांनी अन्न आणि औषध पुरवठा करण्यासोबतच शेतकºयांना बियाणे आणि खतेसुद्धा घरोघरी देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे, अशी माहिती पदाधिकाºयांनी फडणवीस यांना दिली.या आढावा बैठकीला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, रावसाहेब दानवे, सरोज पांडे, व्ही. सतीश, महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री पंकजा मुंडे, आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.लोकापर्यंत मदत पोहोचविण्यासाठी कार्य करासध्या देशभरात ‘लॉकडाऊन’ची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. ही मदत करताना ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या नियमांचे काटेकोरपणे पालन होईल, हेही कार्यकर्त्यांनी सुनिश्चित करावे, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले. घरी राहायचे असले तरी ही सुटी नाही. त्यामुळे आपली स्वत:ची काळजी घेतानाच अधिकाधिक लोकांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी काम करा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.