नागपूर : एकीकडे काँग्रेसच्या नेत्यांनी स्वबळाचा झेंडा हाती घेतला, तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनीच राष्ट्रवादीला बैठकीचे आमंत्रण दिले. दोन्ही पक्षांचे सदस्यत्व रद्द झालेल्या जागांवर ‘सिटिंग गेटिंग’ ठरले; पण भाजपकडे असलेल्या ४ जागांवर कुणी निवडणूक लढावी हे कोडे काही सुटलेले नाही. राष्ट्रवादीने या चार जागेवर फिप्टी-फिप्टीचा प्रस्ताव काँग्रेसला दिला. काँग्रेसने त्यावर वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतली आहे.
शेतकरी भवनात पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना बैठकीसाठी आमंत्रित केले होते. राष्ट्रवादीचे माजी मंत्री रमेश बंग व जिल्हाध्यक्ष बाबा गुजर हे बैठकीला उपस्थित होते. बैठकीत काँग्रेसच्या जे सर्कल रद्द झाले. त्या सर्कलवर काँग्रेस लढणार व राष्ट्रवादीच्या रद्द झालेल्या सदस्यांच्या जागेवर राष्ट्रवादीच लढणार हे सूत्र आघाडीसाठी पोषक ठरले; पण उरलेल्या भाजपाच्या चार जागा लढण्यासंदर्भात राष्ट्रवादीने काँग्रेसपुढे प्रस्ताव ठेवला. यात गुमथळा आणि राजोला या सर्कलमध्ये राष्ट्रवादीला उमेदवारी देण्याचा प्रस्ताव बैठकीत ठेवला; पण या निर्णयावर बैठकीत तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे पुन्हा बैठक होणार असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी सांगितले.
- सेनेने पुढाकार घेऊनही प्रतिसाद नाही
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे शिवसेनेने पुढाकार घेऊन राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांशी संपर्क साधला; पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शिवसेनेने १६ जिल्हा परिषद व ३१ पंचायत समित्या स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.
-संदीप इटकेलवार, जिल्हाप्रमुख, शिवसेना