काटोल : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी (दि.५) शेवटचा दिवस आहे. यातच काटोल तालुक्यात राष्ट्रवादीला धक्का देण्यासाठी भाजपने अॅक्शन प्लॅन निश्चित केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने जिल्ह्यातील १६ जि. प. सर्कल व ३३ पंचायत समिती गणात पोटनिवडणूक होत आहे. त्यानुसार काटोल तालुक्यातील येनवा व पारडसिंगा जि. प. सर्कल तर लाडगाव व मेंटपांजरा पंचायत समिती गणात ही निवडणूक होत आहे. यातच तीन महिन्याअगोदर राष्ट्रवादीचे काटोल तालुका कार्याध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले नीलेश धोटे अचानक भाजपच्या गोटात सामील झाल्याने तालुक्यात राजकीय पारा तापला आहे.
गत निवडणुकीत येनवा जि. प.सर्कलमध्ये राष्ट्रवादी-शेकापचे उमेदवार समीर उमप यांनी ९०२४ मते मिळवीत भाजपचे दिलीप ठाकरे यांचा पराभव केला होता. ठाकरे यांना ४,३७६ मते मिळाली होती. याच निवडणुकीत नीलेश धोटे यांना राष्ट्रवादीने ही जागा शेकापला गेल्याचे सांगितल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढत ३०७८ मते घेतली होती. तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी त्यांची घरवापसी करीत तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली होते. मात्र धोटे यांनी पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांना येनवा सर्कलमध्ये उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे पारडसिंगा जि.प. सर्कलमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर कोल्हे यांचे सर्कल सर्वसाधारण
महिला संवर्गासाठी आरक्षित झाल्याने त्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. कोल्हे यांना टक्कर देण्यासाठी भाजपच्या किसान विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदीप सरोदे यांच्या पत्नीला भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
गतवेळी अशी मिळाली होती मते
येनवा जि.प.सर्कल
समीर उमप (राकाँ-शेकाप आघाडी)- ९०२४
नीलेश धोटे (अपक्ष)- ३०७८
दिलीप ठाकरे (भाजप)- ४६४८
पारडसिंगा सर्कल
चंद्रशेखर कोल्हे (राष्ट्रवादी)- ७६९४
संदीप सरोदे (भाजपा)- ६१४०