लाेकमत न्यूज नेटवर्क
काटोल : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. याचे पडसाद रविवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघातही उमटले. देशमुख यांनी सचिन वाझे यांना १०० कोटींच्या वसुलीचे आदेश दिल्याच्या परमबीर सिंग यांच्या आरोपाची चौकशी करण्यात यावी. यासोबतच देशमुख यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने राजीनामा घ्यावा अथवा नैतिकता बाळगत देशमुख यांनी गृहमंत्रिपद सोडावे अशी मागणी करीत भाजपच्या वतीने काटोल येथील आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. देशमुख यांच्या कृतीमुळे काटोल शहराचे नाव राज्यात बदनाम होत असल्याचा आरोप याप्रसंगी भाजप नेत्यांनी केला. भाजपचे जिल्हा महामंत्री किशोर रेवतकर, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष संदीप सरोदे, काटोल भाजपा कार्याध्यक्ष विजय महाजन, जितू तुपकर, दिलीप ठाकरे, उकेश चव्हाण, सोपान हजारे, योगेश चाफले, प्रमोद धारपुरे, प्रतिभा गवळी, विद्या कावळे, कल्पना नागपुरे, सुनील कोरडे, मनोज कोरडे, अनिकेत अंतुरकर, राजू चरडे, हेमराज रेवतकर, किशोर गाढवे, दिनेश ठाकरे यांच्यासह काटोल, नरखेड तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.