पत्रपरिषद : प्रदेश सरचिटणीसांची माहितीअमरावती : प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यालाच येत्या विधानसभेत भारतीय जनता पक्षाची उमेदवारी दिली जाईल, अशी माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. बाळ भेडगे यांनी रविवारी येथे दिली.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती व चाचपणीसाठी आ. भेडगे अमरावतीत आले असता त्यांनी येथील शासकीय विश्रामभवनात पत्रपरिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. भेडगे यांच्या मते, भाजपची संघटनात्मक शक्ती वाढली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या सूत्रात यावेळी बदल व्हावा, ही पक्षश्रेष्ठींची मागणी आहे. अमरावती जिल्ह्यात भाजपक्षात उमेदवारीसाठी गर्दी वाढली आहे. पक्षाची शक्ती वाढत असल्याचे हे द्योतक आहे. पुढची विधानसभा निवडणूक ‘महायुती’ म्हणूनच लढविली जाईल. काही मतदारसंघात जागा वाटपात फेरबदलाचे संकेतही त्यांनी दिले. उमेदवारी देण्याचे निकष ठरले असून स्वच्छ प्रतिमेच्या व निष्ठावान कार्यकर्त्यांचा यासाठी विचार केला जाईल, असे भेडगे म्हणाले. बाहेरील व्यक्तींनी सुद्धा उमेदवारीसाठी भाजपक्षात प्रयत्न चालविले आहेत. अशा व्यक्तींना उमेदवारी देताना स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विचारात घेऊनच निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.आगामी विधानसभेनंतर आघाडी शासन पायउतार होण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महायुतीत जागावाटपाची चर्चा लवकरच सुरु होणार असून १५ आॅगस्ट रोजी महायुतीच्या उमेदवारांची घोषणा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. अमरावती जिल्ह्यात भाजपसाठी चांगले वातावरण असल्यामुळे आमदारांची संख्या वाढेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. अमरावती, मोर्शी, मेळघाट व धामणगाव रेल्वे या भाजपच्या वाट्याला असलेल्या मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. उर्वरित तिवसा, अचलपूर, दर्यापूर या मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत असून हा अहवाल भाजपच्या राज्य कोअर समितीकडे सुपूर्द केला जाईल, असे ते म्हणाले. भाजपात ‘ अच्छे दिन आ गये’ हे जरी खरे असले तरी कार्यकर्त्यांना न्याय देताना जुन्या कार्यकर्त्यांचा नक्कीच विचार होईल, असे त्यांनी प्रांजळपणे कबूल केले. पत्रपरिषदेला भाजपच्या प्रदेश सचिव मेधाताई कुळकर्णी, जिल्हाध्यक्ष प्रकाश भारसाकळे, माजी आ. साहेबराव तट्टे, अरुण अडसड, निवेदीता चौधरी, तुषार भारतीय, दिनेश सूर्यवंशी, संजय अग्रवाल, किरणताई महल्ले आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
भाजपची उमेदवारी प्रामाणिक कार्यकर्त्यांनाच
By admin | Published: August 04, 2014 12:48 AM