लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या नागपूर येथील निवासस्थानापुढे 'काळी दिवाळी' आंदोलन करायला गेलेल्या भाजपच्या नेत्यांसह, शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत, आंदोलनकर्त्यांना हुसकावून लावले.
मुख्यमंत्र्यांच्या नागपूर येथील ‘रामगिरी’ या निवासस्थानासमोर मंगळवारी भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. भाजपच्या किसान आघाडीतर्फे हे आंदोलन पुकारण्यात आले होते. त्यानुसार कार्यकर्त्यांना प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, भाजपच्या राष्ट्रीय किसान मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात एकवटले होते. मात्र, 'रामगिरी'वर पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना अडविले. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. दरम्यान, आंदोलकांनी घोषणा देणे सुरू करताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
महाविकास आघाडी सरकारच्या हलगर्जीमुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांच्या कुटुंबांत दिवाळीत अंधार पसरला आहे. फडणवीस सरकार असताना पाचही वर्ष एकाही शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन आम्ही कापले नाही. मोगल आणि इंग्रजांपेक्षाही हे सरकार शेतकरी आणि सामान्य माणसासोबत वाईट वागत असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
तसेच, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, येथे महापुरामुळे नुकसान झाले. त्यात १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर झाले, परंतु विदर्भातील शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार शासनाकडून होत आहे. वारेमाप आश्वासने व घोषणांचा पाऊस पाडून एकही घोषणा कृतीत न आणणाऱ्या ठाकरे सरकारने आमच्या प्रश्नांची जाहीरपणे उत्तरे द्यावीत अन्यथा जनतेची व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी माफी मागावी. आत्तापर्यंत कुठलेच सरकार महाविकास आघाडी सरकारसारखे वागले नाही, असाही आरोप यावेळी भाजपतर्फे करण्यात आला.