भाजपचे छोटू भोयर काँग्रेसचे उमेदवार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2021 10:30 AM2021-11-22T10:30:11+5:302021-11-22T10:48:45+5:30
काँग्रेसचे मतदार असलेले लोकप्रतिनिधींमध्येही मुळक हेच चमत्कार घडवू शकतात, असा सूर आहे. मात्र, उमेदवार ठरविण्यासाठी झालेल्या बैठकांमध्ये दोन्ही मंत्र्यांनी मुळक यांच्या नावावर विशेष भर दिला नाही.
नागपूर : विधानपरिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी भाजपने माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी जाहीर केली असून काँग्रेसचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. आता भाजपमध्ये फूट पाडून भाजपचे नगरसेवक व नासुप्रचे माजी विश्वस्त छोटू(रविंद्र) भोयर यांना काँग्रेसची उमेदवारी देण्याची तयारी दोन्ही मंत्र्यांनी चालवली आहे. भोयर यांनी रविवारी रात्री भाजपचा राजीनामा दिला असून सोमवारी ते काँग्रेसमध्ये प्रवेश घेणार आहेत.
माजी मंत्री राजेंद्र मुळक लढण्यास इच्छुक होते. मात्र, पालकमंत्री नितीन राऊत व क्रीडामंत्री सुनील केदार यांचे त्यांना उघड पाठबळ मिळाले नाही. आता भाजपमध्ये फूट पाडून भाजपचे नगरसेवक व नासुप्रचे माजी विश्वस्त छोटू भोयर यांना काँग्रेसची उमेदवारी देण्याची तयारी दोन्ही मंत्र्यांनी चालविली आहे. छोटू भोयर हे सोमवारी, सकाळी ११ वाजता काँग्रेसमध्ये प्रवेश घेणार आहेत.
भाजपचे संख्याबळ जास्त आहे. भाजपने माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देऊन त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचा मार्ग मोकळा केला आहे. महापालिकेसह नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे बावनकुळेंसह भाजप ही निवडणूक ताकदीने लढेल, यात शंका नाही. ही वास्तविकता असल्यामुळे काँग्रेसकडून उमेदवारीसाठी फारसे कुणी इच्छुक नव्हते. राजेंद्र मुळक यांनी पक्षाकडे इच्छा व्यक्त केली होती. काँग्रेसचे मतदार असलेले लोकप्रतिनिधींमध्येही मुळक हेच चमत्कार घडवू शकतात, असा सूर आहे. मात्र, उमेदवार ठरविण्यासाठी झालेल्या बैठकांमध्ये दोन्ही मंत्र्यांनी मुळक यांच्या नावावर विशेष भर दिला नाही.
दरम्यान, भाजपचे नगरसेवक छोटू भोयर हे दोन्ही मंत्र्यांच्या संपर्कात होते. भोयर यांना उमेदवारी दिली, तर भाजपचा नागपूर शहरातील एक मोठा गट फूटू शकतो, असा या दोन्ही मंत्र्यांचा दावा आहे. शनिवारी भोयर यांनी भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांसह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची त्यांच्या घरी भेटही घेतली होती. पटोले हे या भेटीनंतर रात्री मुंबईला निघून गेले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पटोले हे उमेदवारी ठरविण्याची जबाबदारी राऊत-केदारांवर सोपवून मोकळे झाले आहेत.
या घडामोडीनंतर छोटू भोयर यांचा काँग्रेस प्रवेश निश्चत झाला आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी देविडया काँग्रेस भवनात विशेष बैठक बोलावली आहे. तीत दोन्ही मंत्री व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत छोटू भोयर हे काँग्रेसमध्ये प्रवेश घेणार आहेत. या प्रवेशानंतर सायंकाळी त्यांची उमेदवारी जाहीर केली जाईल, असा दावा केला जात आहे.
पटोलेंच्या प्रदेश कार्यकारिणीत नागपूरला झुकते माप मिळाले. एवढेच नव्हे, तर राज्यभरात विविध जिल्ह्यांचे प्रभारी नेमतानाही नागपूरच्या नेत्यांचीच वर्णी लावण्यात आली. एवढी सक्षम नेत्यांची फळी असताना बावनकुळे यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसला एकही स्वपक्षीय उमेदवार गवसला नाही. भाजपमधून उमेदवार आयात करावा लागत आहे. दरम्यान, भोयर यांनी भाजप सोडू नये यासाठी भाजप नेत्यांकडून त्यांची मनधरणी केली आहे. गेल्या दोन दिवसात प्रमुख नेत्यांनी त्यांची भेटही घेतली, असा दावा भाजपच्या गोटातील सूत्राने केला आहे.
बावनकुळे आज भरणार अर्ज
भाजपचे उमेदवार माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज, सोमवारी सकाळी १०.३० वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते उपस्थित राहतील. या निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख म्हणून शहर अध्यक्ष आ. प्रवीण दटके व सहप्रमुख म्हणून डॉ. राजीव पोतदार यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.