दिनकर ठवळे
कोराडी : जिल्ह्याच्या नजरा लागलेल्या कोराडी ग्रामपंचायतमध्ये १७ पैकी १२ जागांवर विजय मिळवून भाजप समर्थित पॅनेलने सलग पाचव्यांदा सत्ता स्थापन करण्याचा मान मिळवला आहे. येथे काँग्रेस आघाडीला ५ जागेवर समाधान मानावे लागले आहे. इकडे पूर्ण बहुमताच्या दावा करणाऱ्या काँग्रेस आघाडीला केवळ पाच जागा मिळाल्या. मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत विरोधी गटाला एकाही जागेवर विजय मिळाला नव्हता. या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक-२ मधून माजी सरपंच माया डोंगरे तर वार्ड क्र. ४ मधून माजी सदस्य मंदा पारवे , तर (वाॅर्ड क्रमांक-६) मधून निर्मला मोरई व मंदा बनसोड यांना पराभवाचा सामना करावा लागला. माजी सरपंच चंद्रशेखर बीरखेडे यांना (वाॅर्ड क्रमांक-५) मधून मतदारांनी पुन्हा संधी दिली. माजी उपसरपंच उमेश निमोने व अर्चना दीवाने यांना (वाॅर्ड क्रमांक-१) मधून विजयश्री मिळाला. निमोने यांनी प्रतिष्ठेच्या लढाईत १९२ मतांची आघाडी घेत राजेश कंभाले यांचा पराभव केला. निमोने यांचा दाडंगा लोकसंपर्क आणि विकासाचे राजकारण त्यांच्या विजयांचे प्रमुख कारण मानले जात आहे. माजी सदस्य नरेंद्र धनोले व देवा सावरकर यांनाही मतदारांनी पुन्हा सत्ता सोपविली. धनोले यांना २१३ मतांची आघाडी मिळाली. वाॅर्ड क्रमांक १,२ व ५ मध्ये मात्र अपक्षांनी भाजपच्या आदर्श ग्राम निर्माण आघाडी पॅनल तर काँग्रेसच्या परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांच्या विजयाचे गणित बिघडविले. वाॅर्ड क्रमांक- ५ मध्ये अपक्षांनी जोर लावल्यामुळे काँग्रेसला दोन जागा गमवाव्या लागल्या. या ठिकाणी माजी सरपंच राहिलेले मधुकर चिंचूरकर यांची कन्या सुनिता कान्हारकर यांनी मात्र भाजपचा विजय रोखला. वार्ड क्रमांक-२ मध्ये संदीप घुरीले या अपक्ष उमेदवाराने २७० मते घेत विजयाची दिशा बदलली. वार्ड क्रमांक-१ मध्ये विश्रांती रामटेके यांनीही काँग्रेसच्या विजयाचे गणित बदलविले. नणंद भावजय मध्ये भावजयचे पारडे जड झाले. नांदा कोराडी या वाॅर्ड क्रमांक-५ मध्ये भाजप आघाडीच्या वतीने प्रियंका चिंचूरकर तर काँग्रेस आघाडीच्या वतीने सुनिता कांन्हारकर या रिंगणात उतरल्या होत्या .सुनिता कांन्हारकर माजी सरपंच मधुकर चिंचूरकर यांच्या कन्या आहेत तर प्रियंका चिंचूरकर या मधुकर चिंचूरकर यांच्या सून आहेत. प्रियंका चिंचूरकर या नणंद तर सुनिता कान्हारकर या त्यांच्या भावजय. या दोघींनीही या वाॅर्डातून एकमेकी विरुद्ध दंड थोपटले होते. या चुरशीच्या लढाईत सुनिता कान्हारकर यांनी ४०४ मते घेऊन सर्वात जास्त मते प्राप्त करण्याचा मान मिळवित विजयी झाल्या तर प्रियंका चिंचूरकर यांना ३८२ मतांवर समाधान मानावे लागले. विजयी उमेदवारांमध्ये भाजप आघाडीचे उमेश निमोणे, अर्चना दीवाने, नरेंद्र धानोले, रत्नमाला बारमाटे ,उषा कोटगुले ,रोशनी जामदार ,प्रतीक रंगारी, देवेंद्र सावरकर ,वंदना पौनीकर ,आशिष राऊत, चंद्रशेखर बिरखेडे ,प्रीती खोब्रागडे तर काँग्रेसच्या परिवर्तन पॅनलच्या वतीने अविनाश भोयर, सविता केळकर, सुनिता कान्हारकर ,दौलत धुर्वे व निर्मला वीरखेडे यांनी विजय प्राप्त केला.