नागपूर : कुणाच्याही धर्माबद्दल अपशब्द काढण्याचा अधिकार कुणालाही नाही. भाजप प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेले वक्तव्य चुकीचे आहे. हिंदू-मुस्लिम वाद वाढविण्याचा भाजपचा गेम प्लान आहे. नंतर आम्ही हिंदूंचे रक्षणकर्ते सांगून ते मते मागतील, असा आरोप अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २३ वा स्थापना दिवस कार्यक्रम शुक्रवारी गांधीसागर परिसरातील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री रमेश बंग, माजी आ. दीनानाथ पडोळे, शब्बीर विद्रोही, शेखर सावरबांधे, दिलीप पनकुले, प्रशांत पवार, रमन ठवकर, प्रवीण कुंटे, रमेश फुले आदी उपस्थित होते. यावेळी भुजबळ म्हणाले, देशात जेथे जेथे भाजप विरोधी सरकार आहे तेथे ईडी, सीबीआय या तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत काही आमदार ईडीच्या दहशतीत होते, असे सांगत भोंगा, अजान, हनुमान चालिसा, हिंदू- मुस्लिम, राज-राणा हे काय देशाचे प्रश्न आहेत का, असा सवाल त्यांनी केला. यावेळी वर्षा शामकुळे, श्रीकांत शिवनकर, विशाल खांडेकर, चिंटू महाराज आदी उपस्थित होते.
म्हणून नवाब मलिकांचा राजीनामा घेतला नाही
- चूक नसताना दिल्लीच्या महाराष्ट्र सदनावरून मला अडकविले. नंतर हवाहवाई आरोपांवरून अनिल देशमुख यांना तुरुंगात डांबले. त्यावेळी पक्षाने देशमुखांचा राजीनामा घेतला. नंतर नवाब मलिकांना अडकविण्यात आले. एकामागून एक मंत्री अडकविण्याचा यांचा प्लान लक्षात आल्यामुळे नंतर मात्र नवाब मलिक यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला, असे स्पष्ट करीत ‘डरेंगे नही, रुकेंगे नही, लढेंगे और जितेंगे’ असा निर्धार भौजबळ यांनी व्यक्त केला.
मनपा निवडणुकीसाठी जोश भरला
- सभेत सर्वच नेत्यांनी महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. भाजपला रोखणे हे लक्ष्य आहे. काँग्रेसशी आघाडी झाली तर ठीक नाही तर ताकदीने निवडणूक लढू, तुम्ही कामाला लागा, अशा सूचना नेत्यांनी दिल्या.