नागपूर : महावितरणतर्फे थकबाकीदारांची वीजजोडणी तोडण्याचे प्रकार सुरू आहेत. याविरोधात गुरुवारी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे काटोल मार्गावरील विद्युत भवनासमोर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत व राज्य शासनाविरोधात निदर्शने केली.
कोरोनामुळे लोक आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा स्थितीत वीज देयक भरणे शक्य होत नाही. त्यांची स्थिती समजून न घेता थकबाकीदारांची वीज कापली जात आहे. हा प्रकार तत्काळ बंद करण्यात यावा. त्यांना सुलभ हप्त्यांमध्ये देयक भरण्याची सुविधा देण्यात यावी, अशी मागणी भाजयुमोतर्फे करण्यात आली. मुख्य अभियंता दिलीप दोडके यांना निवेदन सोपविण्यात आले व जर आठ दिवसांत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर शहरातील प्रत्येक झोनमध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी बाल्या बोरकर, रामभाऊ अंबुलकर, सचिन करारे, दीपांशु लिंगायत, चंदन गोस्वामी, अमोल तिडके, आसिफ पठान, एजाज शेख, यश सातपुते, अमर धर्ममारे, आशिष मेहर, गुड्डू पांडे, मंगेश धार्मिक, गोविंदा काटेकर प्रामुख्याने उपस्थित होते.