लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपाने जनआशीर्वाद यात्रा काढली आहे. भाजपचे मंत्री राज्यभर फिरत आहेत. मात्र जनतेला महाविकास आघाडीचे काम आवडले आहे. त्यामुळे अशा यात्रांनी काहीच फरक पडणार नसून सर्व ठिकाणी महाविकास आघाडीचा विजय होईल, असा दावा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.
नागपुरात गुरुवारी रात्री पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले, मराठा आरक्षणात राज्य म्हणून भूमिका आणि अशोकराव चव्हाण यांनी चांगलं काम केले. न्यायालयात योग्य बाजू मांडली, मात्र भाजप राजकारण करत आहे, केंद्रानं निर्णय घ्यावा, ५० टक्क्यांवर आरक्षण वाढवावे. विनायक मेटे काय म्हणतात याला आम्ही महत्त्व देत नाही, असा चिमटाही त्यांनी घेतला. देशातील चार सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचे नाव आहे. त्यांचे नाव म्हणजे महाविकास आघाडीचे नाव आहे, असेही थोरात म्हणाले.
बैलांच्या शर्यती व्हायला हव्या. बैलबंडी शर्यतीवरील बंदीचा निर्णयाचा केंद्राने फेरविचार करावा. या शर्यतीमुळे ग्रामीण भागात एक उत्साहाचे वातावरण असते. त्या काळातील परिस्थिती पाहून बंदीचा निर्णय झाला असेल, पण आता सरकार तर भाजपची आहे, त्यामुळे त्यांनी बंदीच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.